धक्कादायक : कोरोनाशी लढणाऱ्या "या' तालुक्‍यातील आरोग्य व महसूल खात्यालाही झाला कोरोनाचा संसर्ग !

Corona Update
Corona Update

मंगळवेढा (सोलापूर) : जनतेच्या बेशिस्त वागण्यामुळे वाढत असलेला कोरोना साथीचा प्रादुर्भाव आता अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या आरोग्य व महसूल खात्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना होऊ लागल्यामुळे, तालुक्‍यामध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. तरीही प्रशासकीय अधिकारी कोरोनाशी मोठ्या धैर्याने लढा देत आहेत. 

आज (बुधवारी) याबाबत उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलगर बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्या 23 जणांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून, 305 जणांना घरात विलगीकरण करण्यात आले आहे, तर तहसील कार्यालयात असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून, त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

तालुक्‍यामध्ये महसूल, पोलिस आणि आरोग्य खात्यामध्ये कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. असे असताना हे कर्मचारी जनतेला उपलब्ध सुविधा, आहे त्या मनुष्यबळावर व साधनसामग्रीवर कोरोनाशी लढा देत आहेत. सध्या तालुक्‍यामध्ये मंगळवेढा, बोराळे, पाटकळ, निंबोणी, सोड्डी, कचरेवाडी या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांशी ग्रामपंचायतींनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com