कट्ट्यावर बसून गप्पा मारल्याने काय होतंय? "या' गावाला मोजावी लागली भली मोठी किंमत

Kattyavar Gappa
Kattyavar Gappa

महूद (सोलापूर) : हवाईमार्गे भारतात आलेल्या कोरोनाने शहरांमध्ये हाहाकार माजवला आणि आता ग्रामीण भागांमध्ये याचा विळखा घट्ट होत चालला आहे. त्यातच अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने कोरोनाच संपला, या आविर्भावात ग्रामीण जनता वावरत आहे. मात्र "निव्वळ कट्ट्यावर बसून गप्पा मारल्याने काय होते?' याची भली मोठी किंमत सांगोला तालुक्‍यातील महूद या गावाने मोजली आहे. प्रशासनाने घालून दिलेले नियम न पाळणाऱ्या लोकांसाठी येथील कथा झणझणीत अंजन घालणारीच आहे. 

सांगोला तालुक्‍यातील महूद हे गाव ना धड शहर, ना धड खेडे या प्रकारात मोडणारे असे आहे. सांगोला ते अकलूज आणि पंढरपूर ते आटपाडी या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांच्या मध्यबिंदूवर ते स्थिरावलेले आहे. आसपासच्या दहा-पंधरा खेड्यांची प्रमुख बाजारपेठ म्हणून तिचा फार पूर्वीपासून लौकिक आहे. सुमारे पंधरा-वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात राहणारे लोक म्हणजे चाकरमाने, व्यावसायिक आणि गावात राहून चार-दोन किलोमीटरवर असणारे शेत कसणारे शेतकरी. 

महूदची मध्यवर्ती जुनी पेठ हा महूदचा अंतर्भाग. राज्य महामार्गाशेजारी नवीन दुकाने झाल्याने दहा-पंधरा वर्षांत तशी ती दुर्लक्षित झाली आहे. तरीही किराणा दुकानदार, ज्वेलर्स आणि भाजी मंडईमुळे तसेच प्रशस्त मारुती मंदिरामुळे ती आजही महत्त्व टिकवून आहे. तीन प्रमुख गणेशोत्सव मंडळे या पेठेतच आहेत. तसेच दरवर्षी महादेव कावडीचा समारोप याच पेठेत शेकडो लोकांच्या उपस्थितीत होतो. या पेठेत राहणारी मंडळी ही महूदचे गावपण जपणारी, रीतिरिवाज, परंपरा जपणारी अशी आहेत. कोणताही व्याप न वाढवता इमानेइतबारे आपला व्यवसाय करावा, शेतीवाडी करावी, आहे त्यात समाधान मानून आनंदाने जीवन व्यतीत करणारी ही मंडळी. 

अगदी चोरपावलांनी केला कोरोनाने संसर्ग 
कोरोनाच्या बातम्यांनी ही मंडळी सुरवातीला गांगरली. शहरातील गावाकडे आलेल्या नागरिकांपासून चार हात दूर राहणे या मंडळींनी पसंत केले. अगदी कडक असा लॉकडाउन दोन ते तीन महिने पाळला. पण अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक दिवस मास्क बांधणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापर यांनी कंटाळलेल्या या मंडळींना पूर्वीप्रमाणे समूह जीवन जगावेसे वाटू लागले. नेमका त्याच वेळेस परगावी जाऊन कोरोनाबाधित होऊन आलेल्या, पण संसर्गापासून अनभिज्ञ असणाऱ्या काही व्यक्ती गावात मुक्तपणे वावरत होत्या. कोरोना कालावधीत अगदी शेजारच्या गावातही न गेलेल्या पेठेतील काही व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्या. कोरोना हा आजार आपल्याला होऊच शकणार नाही, अशा गोड भ्रमात राहणाऱ्या पेठेतील या मंडळींवर कोरोनाने अगदी चोरपावलांनी संसर्ग केला. 22 जुलै रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर कडक उपाययोजना असूनही केवळ पंधरा दिवसांत हा रोग गावाच्या कानाकोपऱ्यात पोचला. 

वाडी-वस्तीत कोरोना होत नसल्याचा भ्रम 
अगदी जवळच्या नातेवाइकांना, संपर्कातील व्यक्तींना तोवर कोरोनाने गाठले होते. परतीचे, प्रतिबंधाचे मार्ग बंद झाले होते. जुन्या पेठेतील व आतार गल्ली या भागातील सात कुटुंबांसह सुमारे 60 ते 65 लोकांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये या भागातील चार ज्येष्ठ नागरिकांचा बळीही गेला आहे. येथील आरोग्य विभाग वारंवार आवाहन करूनही अनलॉक सुरू झाल्यापासून नागरिक पुन्हा गाफील झाले आहेत. त्यातच वाडी-वस्ती व ग्रामीण भागात हा रोग होत नाही, या आविर्भावात येथील लोक कोणतेही नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे महूद परिसरातील ग्रामीण भागातही हा रोग आता आपला विळखा घट्ट करू लागला आहे. अजूनही काही लोक कोरोनाला दीड लाख रुपये अनुदान, साधा सर्दी-खोकला, हर्ड इम्युनिटी आणि देशी उपचाराने बरा होणारा रोग समजून मुक्तपणे वावरत असतील तर त्यांच्यासाठी हे महूदकरांचे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारे आहे. 

महूद कोरोना फॅक्‍ट 

  • पहिला रुग्ण सापडला 22 जुलै रोजी 
  • कट्ट्यावर बसून गप्पा मारल्याने एकाच भागातील सात कुटुंबांतील सर्वजण बाधित 
  • बाधितांमध्ये डॉक्‍टरांचाही समावेश 
  • चार ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू 
  • उपचार सुरू असणारे चार जण 
  • कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 85 
  • मृत्यूचे प्रमाण 4.30 टक्के 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com