ऑनलाईन शिक्षणात मनोरंजनात्मक कलाकृतींमुळे विद्यार्थ्यांना लागली अभ्यासाची गोडी 

शशिकांत कडबाने
Monday, 14 September 2020

याबाबत शिक्षिका मनिषा पांढरे यांनी सांगितले, की दर रविवारी नवनविन कलाकृती करण्यास मिळत असल्याने विद्यार्थी आनंदाने अभ्यासातही लक्ष देत आहेत. पालक दिपाली जाधव म्हणाल्या, माझे पाल्य शिक्षकांनी सांगितलेली कृती आनंदाने करत आहे. त्यानंतर दिलेला अभ्यास मनापासून करतो. त्यामुळे त्याचा शिक्षणाकडील कल वाढत आहे. 

अकलूज (सोलापूर) : कोरोनामुळे सुरू असलेल्या ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणात मनोरंजनात्मक कलाकृतीसह विविध उपक्रमांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून शिक्षकांसह पालकही समाधान व्यक्त करत आहे. 
कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शाळा बंद असल्याने माळेवाडी (अ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गासाठी ऑनलाईन व ऑफलाईन प्रक्रिया राबविली आहे. या नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता यावे यासाठी सर्वप्रथम 'उत्तुंग भरारी' नावाचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्यात आला. त्यात पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी व पालकांना सहभागी करून घेतले व दररोज सकाळी ऑनलाईन अभ्यास पाठविण्यास सुरुवात झाली. त्याप्रमाणे विद्यार्थी अभ्यास करु लागले पण प्रतिसाद खूपच कमी होता. काही पालकांच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन पीडीएफ फाईल वाटप करण्यात येऊ लागल्या. परंतु कोरोनाच्या वाढता संसर्गामुळे यावरही बंधने येऊ लागली. शिक्षण प्रवाहात विद्यार्थी टिकावेत, शिकावेत, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी मुलांना दर रविवारी एक मनोरंजनात्मक कृती देण्यात येऊ लागली. त्यात विविध उपक्रम व कृतींचा समावेश केला गेला. त्यात चमच्यापासून विविध कलाकृती, बांगड्यांपासून विविध कलाकृती, कोलाजकाम, रंगभरण, चित्रकला, प्रश्नांची उत्तरे सांगा, सांगा सांगा लवकर सांगा सारखे खेळ, बिया, डाळी यांच्यापासून कलाकृती तसेच कथाकथन स्पर्धा, संभाषण, पानांच्या, भाज्यांच्या व फुलांच्या रांगोळी, मातीपासून गणेशमूर्ती तयार करणे आणि नंतर घरातच विसर्जन करणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले. सुरुवातीला या उपक्रमास विद्यार्थी प्रतिसाद कमी असायचा पण हळूहळू प्रतिसाद वाढला असून पालकही उत्तम प्रतिसाद देत आहेत. या उपक्रमास वर्गशिक्षक विजयकुमार अस्वरे व मनिषा पांढरे यांच्यासह शिक्षक बंडू खडतरे व मुख्याध्यापिका प्रभावती दळवी यांनी विशेष योगदान दिले आहे. तर गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विसतारधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख सुधीर नाचणे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 
याबाबत शिक्षिका मनिषा पांढरे यांनी सांगितले, की दर रविवारी नवनविन कलाकृती करण्यास मिळत असल्याने विद्यार्थी आनंदाने अभ्यासातही लक्ष देत आहेत. 
पालक दिपाली जाधव म्हणाल्या, माझे पाल्य शिक्षकांनी सांगितलेली कृती आनंदाने करत आहे. त्यानंतर दिलेला अभ्यास मनापासून करतो. त्यामुळे त्याचा शिक्षणाकडील कल वाढत आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In online education entertaining works of art make students enjoy learning