आता मोबाईलचे स्थान जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये ! ऑनलाइन शिक्षणामुळे विक्रीत 45 ते 50 टक्के वाढ 

Online Education
Online Education

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : लॉकडाउनमुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीत "मोबाईल'ने आपले स्थान भरभक्कम केले आहे. "वर्क फ्रॉम होम' अन्‌ "ऑनलाइन शिक्षण'मुळे घरातील लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकासाठी मोबाईल अत्यावश्‍यक बनला आहे. एका घरात एकाऐवजी आता प्रत्येकाकडे किमान एक मोबाईल अशी स्थिती आहे. त्यामुळे यंदा मोबाईलच्या विक्रीने उच्चांक गाठला. 

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीचा फटका अनेक क्षेत्राला बसला. मात्र त्यातून बाहेर पडत आता बाजारपेठा सावरताना दिसत आहेत. मार्चपासून बंद पडलेले व्यवहार आता सुरळीत होत आहेत. लॉकडाउनमुळे जीवनावश्‍यक वगळता अन्य वस्तूंची विक्री न झाल्याने व्यापारी चिंतेत होते. याला अपवाद मात्र मोबाईल व्यवसायाचा राहिला. लॉकडाउनमुळे मोबाईलने आपले स्थान जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीत निर्माण केले. त्यामुळे मोबाईल प्रत्येकासाठी अत्यावश्‍यक झाला. 

लॉकडाउनने ग्राहकांचा "ट्रेंड' बदलला. ग्राहकांसाठी नेहमी लक्‍झरियस व महागडी वस्तू या क्रमवारीतील मोबाईलने आपली "नीड' प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे जाणवून दिले. त्यामुळे ग्राहकांचा लोंढा आपोआपच मोबाईल खरेदीकडे वळला. परिणामी मोबाईलच्या विक्रीत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 45 ते 50 टक्के वाढ झाली. 

लॉकडाउनमुळे अनेक कार्यालये, शिक्षण संस्था, उद्योग ठप्प झाले. मात्र त्यांचे कामकाज घरातून सुरू ठेवण्यासाठी नवीन प्रणाली विकसित झाली. त्यासाठी मोबाईल अन्‌ लॅपटॉप अत्यावश्‍यक झाला. या "वर्क फ्रॉम होम'मुळे मोबाईलसह लॅपटॉपची मागणी खूपच वाढली. सध्या मोबाईलऐवजी "स्मार्ट' मोबाईलची "क्रेझ' अन्‌ "गरज'ही तयार झाली. शासकीय सेवेतील अंगणवाडी सेविकांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांपासून ते मॅनेजरपर्यंत, शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांपासून ते प्राचार्यांपर्यंत प्रत्येकाचे काम मोबाईलवरच सुरू झाले ते अद्याप व यापुढेही सुरूच राहणार आहे. 

मोबाईल खरेदी केली तरी दरमहा त्याचे रिचार्ज करण्याचे काम करणेही क्रमप्राप्त असते. त्यासाठीही वापरकर्ते विविध कंपन्यांचा अभ्यास करून परवडणारे रिचार्ज मारण्यावर भर देत आहेत. परंतु सध्या बहुतेक सर्वच कंपन्यांचे रिचार्जचे दर समान झाल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. इंटरनेटचा वापर अत्यावश्‍यक झाल्याने रिचार्जच्या किमती वाढूनही तो खर्च करावाच लागत आहे. घराघरात नवीन स्मार्ट मोबाईल आल्याने जुने झालेले साधे मोबाईल आता लहानग्यांचे खेळणे बनले आहेत. ज्यांच्या घरात लहान कुणी नाही त्यांना मात्र ती अडगळच सांभाळावी लागणार आहे; कारण त्याला कोणी भंगारातही घेत नाही. 

मोबाईल 60 टक्के तर टॅब विक्रीत 40 टक्के वाढ 
लॉकडाउनमुळे शैक्षणिक तसेच अन्य कामकाजासाठी अत्यावश्‍यक बनलेल्या मोबाईलच्या विक्रीत गेल्या चार महिन्यांत सुमारे 60 टक्के तर टॅबच्या विक्रीत सुमारे 40 टक्के वाढ झाली आहे. टॅब विक्रीला यापूर्वी अत्यल्प प्रतिसाद होता. यंदा मात्र त्याची उपयोगिता लक्षात आल्याने त्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोबाईल व टॅब विक्रेत्यांकडून ग्राहकांना चांगल्या व उत्तम दर्जाची सेवा देण्यावर भर असल्याचे मोबाईल विक्रेते अमर सचदेव यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आकर्षक ब्रॅंडवर कंपन्यांचा भर 
सध्या सर्वच मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांच्या पसंतीला उतरणारे आकर्षक ब्रॅंड बाजारात आणले आहेत. ग्राहकांकडून ओपो, सॅमसंग, ऍपल, विवो, वनप्लस, रेडमी, रियलमी, लिनोवो, लावा यासह अन्य कंपन्यांच्या मोबाईलला चांगली मागणी आहे. सध्या बाजारात साडेतीन हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत तसेच त्यापुढील किमतीचेही मोबाईल उपलब्ध आहेत. टॅबलाही चांगली मागणी असून आयबॉल, लिनोओ, सॅमसंग, ऍपल यासह अन्य कंपन्यांच्या टॅबसाठी ग्राहकांचा आग्रह आहे. सध्या बाजारात पाच हजार रुपयांपासून 80 हजार रुपयांपर्यंतचे टॅब उपलब्ध असल्याचे ओपोचे सेल्स प्रमोटर अभिजित देशपांडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सोलापूर शहरातील स्थिती 

  • संगणकाची सुमारे 100 दुकाने 
  • मोबाईल कंपन्यांची सुमारे 100 दुकाने 
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोबाईल विक्रीत 60 टक्के वाढ 
  • टॅब विक्रीत 40 टक्के वाढ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com