झेडपीच्या दप्तरी फक्त 367 जनावरे लम्पीने आजारी 

lumpi.jpg
lumpi.jpg

सोलापूर: माणसांना कोरोनाने हैराण केल्यानंतर पशुधनाला लम्पी आजाराने ग्रासले आहे. जिल्ह्यातील शेतकरी लम्पीच्या वाढत्या संसर्गामुळे हैराण झाले असताना सोलापूर जिल्ह्यातील फक्त 367 जनावरांनाच लम्पीची बाधा झाली आणि त्यातील 225 जनावरे बरेही झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे झाली आहे. जिल्हा परिषदेकडे फक्त 367 जनावरांनाच या आजाराची बाधा झाल्याची नोंद झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 


जिल्हा परिषदेचे प्रशासन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले असताना दुसरीकडे पशुधनावर आलेल्या लम्पीच्या संकटाला तोंड देण्यासाठी मात्र जिल्हा परिषदेकडे पुरेसे मनुष्यबळही नसल्याचेही समोर आले आहे. 

जिल्हा परिषदेत पशुधन विकास अधिकाऱ्याची 131 पदे मंजूर आहेत. त्यातील 90 पदे कार्यान्वित आहेत, तर 41 पदे रिक्त आहेत. सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्याची 32 पदे मंजूर आहेत. त्यातील फक्त नऊच पदे कार्यान्वित असून, तब्बल 23 पदे रिक्त आहेत. 
पशुधन पर्यवेक्षकांची 143 पदे सोलापूर जिल्हा परिषदेला मंजूर आहेत. त्यातील 117 पदे कार्यान्वित असून, 26 पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात लम्पीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मुक्‍या पशुधनाचे दुःखही मुकेच राहिले आहे. 

पशुपालकांनी घाबरू नये 
सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. या आजारामुळे जिल्ह्यातील एकाही पशुधनाचा मृत्यू झाल्याची नोंद आमच्याकडे नाही. या आजारामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. 
- डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी 

पशुधन अधिकाऱ्यांची सातही पदे रिक्त 
अक्कलकोट तालुक्‍यासाठी मंजूर असलेली पशुधन विकास अधिकाऱ्यांची सातही पदे सध्या रिक्त आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील सर्वच्या सर्व पदे रिक्त असल्याने पशुपालक शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. जिल्हा परिषदेकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करूनदेखील हा प्रश्‍न सुटलेला नाही. 
-आनंद तानवडे, सदस्य, जिल्हा परिषद  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com