ऑपरेशन लोट्‌स हे भाजपचे दिवास्वप्नच ! पदवीधर- शिक्षक आमदारकीनंतर भक्‍कम झाली 'महाविकास' आघाडी

तात्या लांडगे
Monday, 7 December 2020

चंद्रकांत पाटलांची भाषा गुर्मीची 
शेतकरी आंदोलनप्रश्नी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुर्मीचे भाष्य केले. शेतकऱ्यांप्रश्नी केलेले वक्तव्य त्यांना न शोभणारे असून सत्ता त्यांच्या डोक्‍यात गेली होती म्हणून ते असे बोलत असल्याची टीका माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली. मागील वर्षभरापासून भाजपकडून येनकेनप्रकारे राज्यातील सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, त्यांचे हे दिवास्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. सध्याही ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या केवळ चर्चाच असून भाजपचे ऑपरेशन लोटसचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

 सोलापूर : मागील वर्षभरापासून भाजपकडून येनकेनप्रकारे राज्यातील सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, त्यांचे हे दिवास्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. सध्याही ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या केवळ चर्चाच असून भाजपचे ऑपरेशन लोटसचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे माजी आमदार तथा प्रदेश राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे-पाटील म्हणाले. शिक्षक व पदवीधर आमदारकीतून महाविकास आघाडीच्या ताकदीवर शिक्‍कामोर्तब झाले असून मतदारांनाही सरकारच्या बाजूने कौल दिला आहे.

 

ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समन्वयातून उदयास आलेल्या महाविकास आघाडीवर आता जनतेतूनच शिक्कामोर्तब झाले आहे. हे नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालाने स्पष्ट झाले असून या निकालाने महाविकास आघाडी अधिक भरभक्कम असल्याचे सिध्द झाले आहे, असे महाविकास आघाडीचे जिल्हयातील समन्वयक आमदार संजय शिंदे व राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याबरोबरच पुणे विभागातील सर्वच जिल्हयात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. सोलापूर शहर व जिल्हयात आमदार संजय शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिन्ही पक्षातील नेतेमंडळींना एकत्र आणून प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळत महाविकास आघाडीला विजय मिळवून दिला आहे. कधी नव्हे तरी सर्वच नेतेमंडळींचा एकोपा या निवडणुकीत दिसून आला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती कामगिरीवरही नागरिक समाधानी असल्याचे या निवडणूक निकालावरून दिसून येते. भविष्यातही महापालिका, जिल्हा परिषदा व अन्य निवडणुकांत आम्ही तितक्‍याच विश्वासाने सामोरे जाऊ, असा विश्वासही महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते महेश कोठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, जुबेर बागवान, राजेंद्र हजारे, लतीफ तांबोळी, प्रा.राज साळुंखे उपस्थित होते.  

शरद पवारांचा जन्मदिवस 
बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा व्हावा 

सोलापूर : ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी घालविले, ते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा जन्मदिवस शासकीय पातळीवर बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून जाहीर करून त्यानिमित्त राज्य शासनाच्यावतीने तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील उत्कृष्ट फलोत्पादक शेतकऱ्यांना आदर्श शेतीनिष्ठ शरद पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी शहर व जिल्हयातील महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
शरद पवार यांचे शेतीबरोबरच अन्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे. परंतु शेती व शेतकरी हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी केंद्रस्थानी मानून कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल केले. संकरित बियाणे, बियाणांच्या विविध वाण व जाती उपलब्ध करून हरितक्रांती घडवून आणली. साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, बाजार समित्या, वखार महामंडळ, कृषी संशोधन केंद्र, फलोत्पादक संघ, बॅंका, दूध संघ, विकास सोसायट्या अशी कृषी क्षेत्राला पूरक संस्थाची उभारणी करून कृषी व सहकार क्षेत्राता चालना दिली. पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला, हे नाकारून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला दाद देऊन कौतुक केले आहे. गेल्या 65 वर्षांपासून बळीराजा जगला पाहिजे या भूमिकेतून शेतकऱ्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपणाऱ्या आणि आपले संपूर्ण जीवनच शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित केलेल्या पवार यांचा उचित गौरव व्हावा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, राजेंद्र हजारे, लतीफ तांबोळी, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते महेश कोठे, शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या सह्या आहेत. 

कृषीप्रश्नी आजच्या भारत बंदला 
महाविकास आघाडीचा पाठिंबा 

सोलापूर : कृषीविषयक कायदे मागे घेण्यासाठी पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी उद्या (मंगळवारी) पुकारलेल्या भारत बंदला शहर व जिल्हयातील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे जिल्हयातील समन्वयक आमदार संजय शिंदे व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 12 दिवसापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. परंतु सरकार एक पाऊलही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस आंदोलन चिघळत चालले आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून विविध शेतकरी संघटनांनी उद्या (मंगळवारी) भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी, उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते महेश कोठे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, जुबेर बागवान, राजेंद्र हजारे, लतीफ तांबोळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Operation Lotus is BJP's daydream! After graduation-teacher MLA, the lead of 'Mahavikas' became strong