esakal | पंचांगकर्ते दाते म्हणतात, यंदा पाऊस जरा कमीच राहणार ! जाणून घ्या नक्षत्रानुसार पाऊसमान

बोलून बातमी शोधा

Rain
पंचांगकर्ते दाते म्हणतात, यंदा पाऊस जरा कमीच राहणार ! जाणून घ्या नक्षत्रानुसार पाऊसमान
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

दक्षिण सोलापूर : आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा असून, या दिवसापासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होत आहे. या वर्षात पाऊस थोडा कमीच होण्याची शक्‍यता पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केली आहे.

पंचांगामध्ये प्रत्येक संवत्सराचे फल लिहिलेले असते. ग्रामीण भागात तसेच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या संवत्सर फलाचे वाचन करतो आणि त्यानुसार त्याच्या कामाचे नियोजन केले जाते. प्रत्येक संवत्सराचा एक राजा आणि त्याचे मंत्रिमंडळ अशी त्याची रचना असते. तसेच संपूर्ण भारताचा विचार करून त्यांची कार्यक्षेत्रे देखील सांगितलेली असतात. तसेच त्या त्या ग्रहाकडे अधिपत्य असल्याने काय परिणाम मिळेल याची एकेका ओळीत माहिती दिलेली असते.

राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल. आग, चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल. पाऊस कमी पडेल.

 • मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. धिप चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल.

 • खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने पाऊस पुष्कळ पडेल आणि धनधान्याची वृद्धी होईल. राष्ट्राची संपत्ती वाढेल. रोगराई कमी होईल.

 • रसांचा अधिपती रवि असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य होईल. ऊस, तेल, सातू कापूस कमी मिळतील.

 • रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दुधदुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल.

 • नीरसांचा अधिपति शुक्र असल्याने कापूर, गंध, सोने, मोती व कापड यांच्या किमती वाढतील.

यंदा तीन गुरुपुष्यामृत योग

गेल्यावर्षी अधिक मास आल्याने यावर्षीचा गुढीपाडवा उशिराने आहे. गेल्यावर्षी गुरू व शुक्र यांचा साधारण महिने अस्तकाल असल्याने धार्मिक कृत्ये त्या काळात करता आली नाहीत. पण यावर्षी तशी परिस्थिती नसून 23 फेब्रुवारी 2022 ते 20 मार्च 2022 असा एक महिना गुरूचा अस्तकाल आहे. 26 मे रोजी चंद्रग्रहण होणार असून महाराष्ट्रातून हे ग्रहण दिसणार नाही. भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशातून हे ग्रहण दिसेल.

 • 27 जुलै व 23 नोव्हेंबर असे अंगारक चतुर्थीचे दोन योग आहेत.

 • यावर्षी 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आहे.

 • 30 सप्टेंबर, 28 अक्‍टोबर आणि 25 नोव्हेंबर असे एकूण गुरुपुष्यामृत योग आहेत.

 • 4 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असून 5 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आणि 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.

पर्जन्य व हवामान

एप्रिलच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्‍यता दिसते. 19 एप्रिल नंतर उष्णतामानात वाढ होईल. 24 एप्रिल नंतर तापमानात चढ उतार होत राहतील. मॉन्सूनच्या सुरवातीच्या काळात पर्जन्यमान मध्यम राहील. मधली काही नक्षत्रे पर्जन्यास अनुकूल आहेत. पण एकंदरीत पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी राहील असे दिसते मॉन्सूनचे आगमन थोडे लांबेल.

 • मृग नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस मध्यम मानाने होईल. हवेतील उष्णतामान फारसे कमी होईल असे दिसत नाही. दि. 12 ते 18, पाऊस अपेक्षित.

 • आर्द्रा नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस पूर्वार्धात चांगला पडेल, 1 जुलै नंतर पर्जन्यमान कमी राहील. भूकंपाची शक्‍यता दिसते. दि. 26 ते 30 पाऊस अपेक्षित.

 • पुनर्वसु नक्षत्र : मध्यम वृष्टीचे योग आहेत. दि. 10 ते 15 पाऊस अपेक्षित.

 • पुष्य नक्षत्र : या नक्षत्राच्या उत्तरार्धात पाऊस जोर धरेल. दि. 23 ते 29 पाऊस अपेक्षित.

 • आश्‍लेषा नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस संमिश्र दिसत आहे. कांही भागात चांगली वृष्टी होईल. दि. 4 ते 12 पाऊस अपेक्षित.

 • मघा नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल. पण काही भागात वारा सुटून ढग निघून जाण्याच्या घटना घडतील. दि. 20 ते 26 पाऊस होईल.

 • पूर्वा नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस मध्यम ते कमी प्रमाणात होईल आणि सर्वत्र होणार नाही. दि. सप्टेंबर 3 ते 8 पाऊस अपेक्षित.

 • उत्तरा नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस मध्यम प्रमाणात होईल. कांही भागात पिकांना उपयुक्त असा होईल. उष्णतामानात वाढ होईल. दि. 16 ते 22 पाऊस अपेक्षित.

 • हस्त नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस उत्तरार्धात शेवटी बऱ्यापैकी होईल पण खंडीत वृष्टीचे योग आहेत. दि.1 ते 6 अक्‍टोबर पाऊस अपेक्षित.

 • चित्रा नक्षत्र : या नक्षत्रात पर्जन्यमान चांगले राहील पण 9 ऑक्‍टोबर नंतर काही भागात पाऊस ओढ धरेल. दि. 13 ते 19 पाऊस अपेक्षित

 • स्वाती नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस फारसा होणार नाही. दि. 28 ते 31 पाऊस अपेक्षित.

- श्‍याम जोशी