esakal | भाजपकडून परिचारक की अवताडे? मतदारसंघात पोचली उत्सुकता शिगेला

बोलून बातमी शोधा

Awtade_Paricharak

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातून चौघेजण इच्छुक असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारी आमदार प्रशांत परिचारक यांना की समाधान अवताडे यांपैकी कुणाला मिळणार? याची उत्सुकता मतदारसंघात लागली आहे. 

भाजपकडून परिचारक की अवताडे? मतदारसंघात पोचली उत्सुकता शिगेला
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातून चौघेजण इच्छुक असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारी आमदार प्रशांत परिचारक यांना की समाधान अवताडे यांपैकी कुणाला मिळणार? याची उत्सुकता मतदारसंघात लागली आहे. 

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर - मंगळवेढा विधानसभाग मतदारसंघाच्या जागी भालके कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी द्यावी, अशी मागणी तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे पंढरपुरात केली. बैठकीनंतर देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवंगत आमदार भालके यांच्या मतदारसंघात सहानुभूती असल्यामुळे धनगर समाजातील इच्छुकांना देखील त्यांनी थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या निधनानंतर आमदार प्रशांत परिचारकांबद्दल मतदारसंघात सहानुभूती आहे. 

तर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांनी देखील ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या ताकदीने तयारी करत आहेत. त्या दृष्टीने त्यांनी मंगळवेढ्याच्या बरोबरीने पंढरपुरात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गत निवडणुकीत त्यांना शहरात पडलेल्या मतांची दखलही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीत काही सदस्य हाताला लागल्यामुळे त्यांना पंढरपुरात आत्मविश्वास वाढला असतानाच, त्यांनी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे भाजपकडून आमदार परिचारक की आवताडे? याची उत्सुकता मतदारसंघात शिगेला पोचली आहे. 

आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी मंगळवेढा तालुक्‍यात अपेक्षित संपर्क वाढवला नाही. तालुक्‍यातील ग्रामपंचायतींबरोबर दामाजी कारखाना, विविध सहकारी संस्थांमुळे अवताडे यांना मानणारा वर्ग उपजतच आहे. त्यामुळे त्यांना तयारी करताना अडचणी उद्‌भवणार नाहीत, असे चित्र आहे. परंतु ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने देखील आपली ताकद पणाला लावून विविध सेलच्या निवडी दोन दिवसांपूर्वी जाहीर करत तब्बल 14 जणांना विविध सेलचे तालुकाध्यक्ष करून गटबांधणी करण्याच्या दृष्टीने आक्रमक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

राष्ट्रवादीची उमेदवारी भालके कुटुंबात जाणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार मात्र स्पष्ट नसल्यामुळे सध्या विरोधातील उमेदवार कोण असणार? की अवताडे व परिचारक हे दोघेही स्वतंत्र लढणार? याकडे मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल