बेड शिल्लक नसल्याचे सांगत उपचार नाकारले! पंढरपुरात वृद्धाचा मृत्यू

भारत नागणे
Sunday, 23 August 2020

कोरोना महामारीमुळे अनेकांचे जीव टांगणीला लागले आहेत. यामध्ये दुर्दैवाने अनेकांचे प्राणी ही गेले आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना महामारीमुळे अनेकांचे जीव टांगणीला लागले आहेत. यामध्ये दुर्दैवाने अनेकांचे प्राणी ही गेले आहेत. कोरोना महामारीतून लोकांचे जीव वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु पंढरपुरातील काही खासगी रुग्णालय व डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका वृध्दाच्या बाबतीत घडला आहे.

खेडगावातून शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या वृध्दावर दिवसभर फिरुनही उपचार मिळाले नाहीत. शेवटी उपचाराअभावी त्यांचा मृत्यु झाला. शेळवे (ता. पंढरपूर) येथी एका वृध्दाच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याने व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळेच मृत्यु झाल्याचा आरोप मृत्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे शहरातील डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभारले आहेच. शिवाय देवदुत म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर देखील इतके निष्ठुर झाले आहेत का असा उद्वीगण सवाल विचारला जात आहे.

शेळवे येथील एका वृध्दाला अनेक वर्षापासून श्वसनाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार देखील केले आहेत. लॉकडाऊन व कोरोना काळात त्यांना त्रास वाढला होता. गेल्या आठवडाभरापासून आणखी जास्त त्रास सुरु झाल्याने 19 ऑगस्टला सकाळी त्यांना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले होते. तेथे त्यांना दाखल करुन न घेता, कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कोरोना चाचणीही केली. परंतु रिपोर्ट दोन दिवसांनी मिळतील असे सांगण्यात आले.

त्यांना एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावा असे सांगण्यात आले. तेथे आल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. दिवसभर संबंधीत रुग्ण आणि त्यांचा मुलगा उपचारासाठी एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयात हेलपाटे घालून थकले होते. कोणीच उपचारासाठी दाखल करुन घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या गावी गेले. तो पर्यंत त्रास अधिकच वाढला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने 20 ऑगस्टला पहाटे त्या वृध्दाचा मृत्यु झाला.

केवळ डॉक्टरांनी उपचार केले नाहीत म्हणून माझ्या वडीलांचा मृत्यु झाला. याला प्रशासन व डॉक्टर जबाबदार आहेत, असा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने केला आहे. यावर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दोन दिवसांपासून कुटुंब उपाशी
संबंधीत वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याच्या संशयाने त्या कुटुंबाकडे गावातील कोणीही फिरकले नाहीत. ना नातेवाईक ना गावातील कोणी जवळचे आले नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपासून त्या कुटुंबातील लोक उपाशी पोटी आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pandharpur a patient died due to untimely treatment