सोलापूर जिल्ह्यात राबवणार कोरोना प्रतिबंधाचा 'पंढरपूर पॅटर्न' : पालकमंत्री भरणे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

आषाढीवारीसाठी भाविकांनी पंढरपूरला येऊ नये 
कोरोना पार्श्‍वभूमीवर यंदाची आषाढी पायी पालखी सोहळा व 1 जुलैची आषाढीची यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे वाकऱ्यांनी पंढपुरात येऊ नये. संकटात काळात राज्यातील वारकऱ्यांनी शासनाला सहकार्य केले आहे. भाविकांनी मंदिर बंद असेपर्यंत पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन पालकमंत्री दत्ता भरणे यांनी केले. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना विषाणू प्रसाराला अटकाव करण्यात पंढरपूर येथील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करून कोरोनावर मात करण्यात यश मिळविले. पंढरपूर पॅटर्नची जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते. 
श्री. भरणे म्हणाले, पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून नियमांची कडक अंमलबजावणी केली आहे. नागरिक आणि अधिकाऱ्यांत योग्य समन्वय करून येथील अधिकाऱ्यांनी पंढरपूर पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्नमुळे पंढरपूर तालुक्‍याने कोरोना विषाणूच्या प्रसारावर मात केली आहे. शासनस्तरावरून आवश्‍यक ती मदत लागल्यास उपलब्ध करून देण्यात येईल. आरोग्य विभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार नाही यांची दक्षता घेऊन तत्काळ कार्यवाही करून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करावी. तसेच कंत्राटी आरोग्यसेविकांचे मानधन तत्काळ द्यावे. जिल्ह्यात कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत निर्माण होणाऱ्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवाव्यात तसेच जिल्ह्यात नवीन रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. 
शासनाकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे अनुदान तत्काळ लाभार्थीच्या नावावर जमा करावे. अवकाळी पावसाने व गारपिटीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप व विम्याची रक्कम उपलब्ध करून द्या. शासनाच्या सूचनांनुसार शाळा सुरू करण्याबाबत योग्य नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. 
यावेळी आमदार भारत भालके यांनी कोविड रुग्णालयाबाबत योग्य निर्णय घ्यावा तर शाळा सुरू होण्यापूर्वी शहरी व ग्रामीण भागातील शाळा तपासून घ्याव्यात असे सांगितले. आमदार दत्तात्रय सावंत यांनी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत नियोजन करावे असे सांगितले. प्रशांत परिचारक यांनी अवकाळी पावसाने व गारपिटीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करा अशी मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur pattern of corona to be implemented in Solapur district say Guardian Minister bharne