ग्रामपंचायतीत बाजी, मग विधानसभेत का होतेय दगाबाजी? पंढरपुरात परिचारक गटाचे पन्नास टक्के उमेदवार विजयी ! 

अभय जोशी 
Monday, 25 January 2021

आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील सुमारे 75 टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. ग्रामीण भागात सोईस्कर आघाड्या स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु निवडून आलेल्या उमेदवारांची गाववार माहिती घेतली असता, परिचारक गटाने पुन्हा बाजी मारल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत तब्बल 50 टक्के उमेदवार विजयी करत परिचारक गटाने तालुक्‍यावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाला भरभरून मिळणारी मते विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र कशी काय कमी होतात, याविषयी चर्चा रंगत आहे. 

माजी आमदार दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायती वर्षानुवर्षे आपल्या गटाच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. गेल्या काही वर्षांपासून आमदार दिवंगत भारत भालके यांनीही ग्रामीण भागातील जनसंपर्क वाढवून तालुक्‍यात आपला प्रबळ गट निर्माण केला होता. दुर्दैवाने कोरोनामुळे तालुक्‍यातील दोन्ही नेत्यांचे निधन झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या पश्‍चात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार? याची उत्सुकता होती. 

आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील सुमारे 75 टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. ग्रामीण भागात सोईस्कर आघाड्या स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु निवडून आलेल्या उमेदवारांची गाववार माहिती घेतली असता, परिचारक गटाने पुन्हा बाजी मारल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील एकूण 771 सदस्यांपैकी तब्बल 356 जागी परिचारक गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. दिवंगत भारत भालके यांच्या पश्‍चात त्यांच्या गटाच्याही सुमारे 227 उमेदवारांनी विजय मिळवत गुलाल उधळला, हे देखील विशेष मानले जात आहे. याशिवाय तालुक्‍याच्या ग्रामीण भागात सक्रिय असलेल्या कल्याणराव काळे गटाचे 104 सदस्य निवडून आले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

तालुक्‍याची विभागणी पंढरपूर, माढा, मोहोळ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात झाल्यापासून आमदार बबन शिंदे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान काळे यांच्या गटाचेही पंढरपूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील बळ दिवसेंदिवस वाढत असल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे, शेतकरी संघटना आणि अपक्षांनी देखील काही ग्रामपंचायतीत सदस्य निवडून आणले आहेत. 

पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समिती, पंढरपूर अर्बन बॅंक यासह शहर व तालुक्‍यातील अनेक संस्था वर्षानुवर्षे परिचारक गटाच्या ताब्यात आहेत. पांडुरंग कारखाना आणि बाजार समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग परिचारक गटाशी मोठ्या संख्येने जोडला गेलेला आहे. अनेक कारखाने अडचणीत आलेले असताना आमदार प्रशांत परिचारक यांच्या उत्तम नियोजनामुळे पांडुरंग कारखाना सातत्याने प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या कारखान्याकडे तसेच उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखालील युटोपियन कारखान्याकडे केवळ परिचारक गटाचेच नव्हे तर विरोधी बाजूचे शेतकरी देखील आपला ऊस प्राधान्याने गळितासाठी पाठवतात. त्यामुळे ग्रामीण भागात परिचारक गटाने विश्वास संपादन केल्याचे दिसून येते. मात्र, गेल्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये परिचारकांना या मतदारसंघामध्ये यश मिळविता आले नाही, हे देखील वास्तव आहे. 

स्थानिक स्वराज संस्थेत यश, विधानसभेत अपयश 
वर्षानुवर्षे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतात. नगरपालिका निवडणुकीत देखील परिचारकांवर विश्वास ठेवून नागरिक त्यांच्या उमेदवारांना विजयी करतात. असे असताना विधानसभा निवडणुकीत मात्र परिचारक गटाची मते कमी का होतात, याचा विचार परिचारक गटाच्या नेतेमंडळींनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. आगामी पोटनिवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला मोठा विजय परिचारक गटाला बळ देणारा आणि भालके गटाचा उत्साह वाढवणारा आहे, हे निश्‍चित. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pandharpur taluka Gram Panchayat election fifty percent candidates of Paricharak group have won