परिचारकांनी आधी स्वतःचे घर द्यावे, मगच टीका करावी; आमदार भालकेंचा पलटवार 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 29 मे 2020

अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने काम करावे 
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने काम करावे, त्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही. कोरोना काळात कोणी राजकारण करत असेल तर जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही आमदार भालके या वेळी म्हणाले. 

पंढरपूर (सोलापूर) : बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी आमदार भारत भालकेंनी आपला बंगला प्रशासनाला देण्याचे जाहीर केल्यानंतर आमदार प्रशांत परिचारक आणि भालके यांच्यात नव्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. आमदार प्रशांत परिचारकांनी आधी आपलं स्वतःचे घर लोकांच्या आरोग्य सेवेसाठी द्यावे आणि मगचं माझ्यावरती टीका टिप्पणी करावी. तुमची नगरपालिका सक्षम आहे, तर लोकांना दररोज पिण्याचे पाणी आणि खड्डेमुक्त रस्ते का देत नाही, असा सवाल उपस्थित करून स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आमदार परिचारकांची ही नौटंकी आहे, असा पलटवार आमदार भालके यांनी आज पत्रकार परिषदेत केला 
सोलापूरनंतर पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच मुंबई, पुणेसह अन्य शहरांतून लोक मोठ्या संख्येने पंढरपुरात आले आहेत. अशा लोकांना क्वारंटाइन करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आमदार भारत भालके यांनी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाजवळ असलेला दुमजली राहता बंगला नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी किंवा अधिकाऱ्यांना राहण्यासाठी मी प्रशासनाकडे देत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे. आमदार भालकेंनी आपला बंगला क्वारंटाइनसाठी दिल्याची बातमी कळताच भाजप आमदार प्रशांत परिचारकांनी आमदार भालकेंचे नाव न घेता त्यांच्यावर नगरपालिका सक्षम आहे, कुणी घर किंवा बंगला देण्याची गरज नाही, असे म्हणत बोचरी टीका केली होती. आमदार परिचारकांच्या टीकेला आमदार भालके काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले होते. आमदार भालकेंनीही आज पत्रकार परिषदेत आमदार परिचारकांना रोखठोक उत्तर दिले. 
भालके म्हणाले की, आमदार प्रशांत परिचारकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचे कोणतेही घर द्यावे, त्यांनी दिले म्हणून मला राग येण्याचे काहीच कारण नाही. उलट मी दिले म्हणून त्यांनी ईर्षेने पंतनगरीतील एखादा बंगला द्यावा, आम्ही त्यांचे स्वागत करू. परंतु त्यांनी विनाकारण राजकारण करू नये. विधानसभेत झालेल्या पराभवाची मळमळ अजून गेली नाही. त्यामुळेच ते वैफल्यग्रस्त होऊन अशी टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला मी भिक घालत नाही. मी जनतेचा आमदार आहे, असे म्हणाले. या वेळी किरण घाडगे, संदीप मांडवे, नगरसेवक राहुल साबळे, सुधीर धोत्रे, नागेश यादव आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paricharak should first give his own house then criticize MLA Bhalkes counter