ठाकरे, पवार सरकार शब्दाला जागेल? 

ठाकरे, पवार सरकार शब्दाला जागेल? 

वैराग (जि. सोलापूर) ः महाआघाडी सरकारकडून वैराग तालुका निर्मितीच्या वैराग भागातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता दिलेल्या शब्दाला मुख्यमंत्री ठाकरे आणि उमुख्यमंत्री पवार सरकार जागेल का? असा प्रश्‍न आता वैराग भागातून विचारला जात आहे. 

बार्शी विधानसभा मतदारसंघातील वैराग भाग हा सर्वात मोठा व महत्त्वाचा समजला जातो. वैराग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत वेळावेळी वैराग तालुका निर्मितीचा मुद्दा जोर धरतो. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा 2019 मध्ये राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची सत्ता आमच्या हाती दिल्यास पहिल्यांदा वैराग तालुका निर्मिती घोषित करू, अशी घोषणा केली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाल्यास पहिला तालुका म्हणून वैराग करू, अशी डरकाळी फोडली होती. दोन्हीही नेते राज्याच्या महत्त्वाच्या पदावर असल्याने वैराग तालुक्‍याची निर्मिती होणारच अशी स्वप्ने वैराग भागातील मतदाराला पडू लागली आहेत. याआधी 1995 मध्ये शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वैराग तालुक्‍याची घोषणा जाहीर केली होती. पण लालफितीत अडकलेल्या या मागणीला बाळसे काही येईना. 

सुरवातीस बार्शी विधानसभा मतदारसंघात वैराग हा भाग नव्हता. तो मोहोळ विधानसभा मतदारसंघात सामील होता. नंतर तो बार्शी मतदारसंघात जोडला गेला. वैराग भागाची लोकसंख्या व शासनाकडे जाणाऱ्या महसूल करांचा विचार केला तर स्वतंत्र मतदारसंघ होण्यास पात्र आहे. वैरागची बाजारपेठ मोठी असून आर्थिक उलाढालीने तिची ओळख राज्यात आदर्शवत ओळखली जाते. या ठिकाणी बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीची विस्तारित उपसमिती कार्यरत आहे. वैराग हे आर्थिक, भौगोलिक, महसूल व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून तसा अहवाल प्रशासन विभागाकडे आहे. 

बार्शी मतदारसंघात 138 गावे असून जवळपास निम्मी गावे ही वैराग भागात आहेत. वैरागला संतनाथ (भोगावती) सहकारी साखर कारखाना असून पुन्हा चालू होण्यासाठी न्यायालयीनच्या अंतिम निर्णयावर आहे. तो सध्या बंद अवस्थेत आहे. वैराग हा भाग तसा आत स्वयंपूर्ण असून त्यास आता तालुका म्हणून मान्यता मिळावी, अशी आग्रही मागणी येथील नागरिक अनेक दिवसांपासून करत आहेत. त्यासाठी विविध मागण्या, निवेदने आणि मोर्चेही झाले आहेत. पण राजकीय परिस्थिती पाहता वैराग हा भाग बार्शीत असावा अशी राजकीय इच्छा प्रथमापासून आड येत आहे. 

बार्शी तालुक्‍यात 138 गावे असून नव्याने वैराग तालुका निर्मिती झाल्यास वैराग भागातील 54 गावांचा समावेश होणार आहे. वैरागच्या भूमीत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हातात महाराष्ट्राचा मंगल कलश दिला होता. दिवंगत इंदिरा गांधी, शंकरराव चव्हाण, मोरारजी देसाई, बॅरिस्टर ए. आर. अंतुले, शरद पवार, मनोहर जोशी अशा अनेक ज्येष्ठ व सामाजिक नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. याच भूमीतून रोजगार हमी योजनेसारखा कायदा तयार झाला व पुढे तो संपूर्ण देशासह परदेशात पोचला. 
"रेंगाळलेला प्रश्‍न मार्गी लागावा' 
शिवसेनेच्या मागील सरकारने याबाबत सकारात्मक पाऊले उचलली होती त्यामुळे आणि आताचे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बार्शीत आल्यानंतर वैराग तालुका निर्मितीचा शब्द बार्शी व वैराग भागातील जनतेला दिला होता. ठाकरे सरकार आता याबाबत काय पाऊले उचलते याकडे लक्ष लागले आहे. कारण उदगीर जिल्हा निर्मितीसाठी हालचालींना वेग आला आहे. 1995 ला ज्या वेळी युतीची सत्ता होती त्या वेळी 23 तालुक्‍यांच्या निर्मितीची घोषणा झाली. त्या वेळी वैराग तालुका मागणी प्रथम क्रमांकांवर होती. पण वाशी, लोहारा तालुक्‍याची निर्मिती झाली पण वैराग तालुका निर्मिती काय होऊ शकली नाही. 

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com