
मंगळवेढा (जि. सोलापूर) : सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात देशभर मोर्चे काढून सत्ताधारी पक्षाविरोधात वातावरण केले जात आहे. दोन धर्मांत मोठा वाद असल्यासारखी वातावरण निर्मिती या कायद्याचे समर्थक आणि विरोधकांकडून केली जात आहे. अशा वातावरणात मंगळवेढ्यातील कवीची एक कविता सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.
हेही वाचा - दोघांच्या लग्नानंतरचा सुरू असलेला संघर्ष
मंगळवेढा येथील वात्रटिकाकार शिवाजी सातपुते यांची ही कविता आहे. सातपुते यांनी आपल्या कवितेतून महाराष्ट्रात संतनगरी म्हणून परिचित असलेल्या मंगळवेढ्यातील जातीयवादाला मूठमाती देत सर्वधर्मसमभावची शिकवणी दिली आहे. ही कविता जातीयवाद करणाऱ्यांना सणसणीत चपराक मारते. सातपुते यांनी आपली कविता सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केल्यानंतर तिला भरभरून प्रतिसाद मिळू लागला. या कवितेतून त्यांनी मंगळवेढेकरांची जातीयता न मानणण्याची एक अनोखी शिकवण सर्वांसमोर ठेवली आहे. गोफणगुंडा या सदराखाली सातपुते यांनी ही कविता लिहिली आहे.
हेही वाचा - राज्यातील पोलिस पाटलांसाठी दिलासादायक बातमी
सातपुते यांची कविता -
कोण आहेत ही माणसं
ते म्हणतात मुस्लिम गद्दार,
हे म्हणतात हिंदू गद्दार
कधी ऐकलं नाही आम्ही
म्हादाच्या आईनं महम्मदला
घराबाहेर हाकललं
अन् महम्मदच्या आब्बानं
म्हादाला जेवत्या ताटावरनं उठवलेलं
गैबीसाहेबाच्या उरुसात
शिवा कांबळ्याच्या बॅंडवर ठेका धरून नाचणाऱ्या
हिंदू-मुस्लिमांची पोरात,
हजारो मराठ्यांच्या लग्नात
हजरत काझीनं म्हटलेल्या मंगलाष्ठकेत,
मस्तान मुल्लाच्या भजनात
प्रल्हाद शिंदेंनी गायलेल्या कव्वालीत
कधीच जाणवली नाही आम्हाला गद्दारी
अहमदभाई मुलाणीच्या
नवरात्र महोत्सवात,
बाबूभाई मकानदारच्या
विटांनी बांधलेल्या आमच्या घरा-घराघरात
डॉ. रिहाना मुलाणीच्या दवाखान्यात
अरे
सत्तर वर्षं झाली
आम्ही ऐकमेकांचे अश्रू पुसले
ईद, दिवाळी, सुख दुःखात
एकाच ताटात जेवलो
अन् खिशातल्या कडकीला
ऐकमेकांना कडकडून भेटलो
आम्हाला कधी दिसली नाही गद्दारी....!
अरे कोण आहेत ही माणसं
हिंदू-मुस्लिमात भिंत बांधणारी
धर्मांध कुठले...?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.