नव्या आदेशानुसार "येथे' दंडात्मक कारवाई सुरू; नागरिक म्हणतात, आम्हाला आदेशाची माहितीच नाही 

Police Reciept
Police Reciept

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्क न वापरल्यास, दुचाकीवरून एकऐवजी दोनजण निघाल्यास, चारचाकी वाहनातून तिघांपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करताना दिसल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काल (ता. 5) काढले आहेत. परंतु या आदेशाची सर्वसामान्य लोकांना माहिती झालेली नसताना आज येथे पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित भागासाठी काल 5 जुलै रोजी एक आदेश काढला आहे. सर्व सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी व प्रवासामध्ये सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग)चे पालन करणे, चेहऱ्यावर मास्क, रुमालचा वापर करणे बंधनकारक आहे. सर्वांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे आवश्‍यक आहे. नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धूम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री बंद ठेवावी. उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास पुढीलप्रमाणे दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

कंसातील आकडा दंडाच्या रकमेचा याप्रमाणे : मास्क न वापरल्यास (100 रुपये), दुचाकीवरून दोघांनी प्रवास केल्यास (500 रुपये), दुचाकीवरून तिघांनी प्रवास केल्यास (वाहन चालकाकडून 750 रुपये), तीनचाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसल्यास (वाहन चालकाकडून प्रतिव्यक्ती 500 रुपये), निर्धारित वेळेनंतर दुकान उघडे ठेवल्यास (अत्यावश्‍यक सेवा वगळून) पहिल्या वेळी एक हजार रुपये दंड तर दोन वेळा दंड झाल्यास तिसऱ्यावेळी दुकानाचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करणे, साठ वर्षापेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नोकर दुकाने, आस्थापनांमध्ये आढळल्यास सात दिवसांपर्यंत दुकान सील करणे, दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास (आस्थापनेस) 500 रुपये आणि 1000 रुपये (दुसरे उल्लंघन). होम क्वारंटाइन योग्य रीतीने न पाळल्यास 1000 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रुपये, दुकानदार, व्यावसायिक, फिरते फळविक्रेते यांनी मास्क न वापरल्यास 100 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, पोलिस निरीक्षक यांनी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे तर गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची माहिती नसल्याने आज शहरातील अनेक दुचाकी वाहनचालक नेहमीप्रमाणे दोन व्यक्तींसह निघाले होते. पोलिसांनी अशा अनेक दुचाकी चालकांना अडवून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. 

दंडात्मक कारवाई झालेले सागर साबळे म्हणाले, आपण मित्रासह दुचाकीवरून निघालेलो असताना सावरकर चौकात आमची गाडी अडवून पोलिसांनी आमच्यावर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. दंड वसुलीला आमचा विरोध नाही, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पूर्वसूचना लोकांना न देता कारवाई केली जाणे योग्य वाटत नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com