वीरगळींची शिल्पे देताहेत उंदरगावच्या लढाईची व सोलापूर जिल्ह्याच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष! 

Veergal
Veergal

माढा (सोलापूर) : छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या इ. स. 1689 ते 1700 या काळात छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली ज्या निर्णायक घटना घडल्या, त्यातील महत्त्वाचे प्रसंग सोलापूर जिल्ह्यात घडले आहे. मुगल सत्तेला खिळखिळे करण्यात सोलापूर जिल्ह्याचा व विशेषतः "सीनथडी' अर्थात सीना नदीकाठाचा सिंहाचा वाटा असल्याचे उंदरगावात (ता. माढा ) सापडलेल्या वीरगळ शिल्पांतून स्पष्ट होत असल्याचे इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांनी संशोधनातून व समकालीन अस्सल पुराव्यांसह उजेडात आणले आहे. 

उंदरगावातील (ता. माढा ) ऐतिहासिक मारुती मंदिरात व परिसरात, युद्धात मरण पावलेल्या योद्‌ध्यांची, घोडदळ, पायदळांच्या युद्धाचे प्रसंग कोरलेली शिल्पे आहेत. ही इ.स. 25 जानेवारी 1700 रोजी झालेल्या उंदरगावच्या ऐतिहासिक लढाईत धारातिर्थी पडलेल्या योद्‌ध्यांच्या स्मरणार्थ सुमारे 320 वर्षांपूर्वी उभारली गेली असून, ती शिवछत्रपतींची व शंभू छत्रपतींची राजधानी किल्ले रायगडाचा ताबा घेऊन रायगडाला इजा पोचवणाऱ्या मुगल सरदार झुल्फीकारखानच्या उंदरगावात झालेल्या पराभवाची व लढाईत धारातिर्थी पडलेल्या शूर मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देतात. 

याचा श्री. चव्हाण यांनी सांगितलेला घटनाक्रम असा, की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाला मुगल सरदार झुल्फीकारखानाचा वेढा पडल्यावर महाराणी येसूबाईंनी रायगड जिद्दीने लढवला. पण नंतर तो झुल्फीकारखानाच्या ताब्यात गेला. त्याने राजधानी रायगडावर प्रचंड नासधूस केली. छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात डिसेंबर 1699 पासून पुढे झुल्फीकारखानाचा व मुगल फौजांचा वावर सोलापूर जिल्ह्यात वाढला. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज सोलापूर जिल्ह्यातच असून ते मुगलांची सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीची मुख्य छावणी उठवून लावण्याचे नियोजन करीत असताना झुल्फीकारखान राजाराम महाराजांना व सरसेनापती धनाजींना जेरबंद करण्यासाठी हालचाली करत होता. "दमरनी-तैमूरनी' म्हणजेच सध्याच्या टेंभुर्णी परिसरात भीमा नदी ओलांडून परतत असताना छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांना ब्रह्मपुरीतील मुगल छावणी उठवून लावण्याचे आदेश दिले. सोबत राणोजी घोरपडे, हणमंतराव, बहिर्जी हे मुख्य पराक्रमी मराठे सरदार होते. धनाजीरावांनी खानापुरातील मुगल ठाण्यावर 23 जानेवारी 1700 रोजी आक्रमण करून खानापूरचा ठाणेदार आवजी आढळा याला कैद केले. त्याला सोडविण्यासाठी झुल्फीकारखान फौजेसह सीना काठालगत ब्रह्मपुरीकडे निघाला; पण पोचायला उशीर झाला व मराठी फौजा पुढच्या टप्प्यात आल्या. या प्रसंगाचे वर्णन औरंगजेबाच्या खासगी दैनंदिनी अखबारात आलेले आहे. त्याच्या मराठी भाषांतरानुसार "झुल्फीकारखानबहादूरनुसरतजंग खजिना व काफीला परांड्याहून ब्रम्हपुरीच्या तळावर आणीत असता, धनाजी जाधव वगैरे मरहठ्ठे सरदार हे दहाहजार स्वार घेऊन "उंदरगाव परगण्यात' चालून आले. चौदा शाबान (तारीख 25 जानेवारी 1700) रोजी उंदरगावात युद्ध झाले'. 

रहिमतपूर येथील लढाई 11 जानेवारी 1700, खानापूर येथील लढाई आदी या चकमकींनंतर उंदरगाव येथे झालेल्या लढाईत सरसेनापती धनाजीराव व झुल्फीकारखान पुन्हा आमनेसामने आल्याने धनाजीरावांनी जोरदार हल्ला चढवला. खानासह दाऊदखान, रामसिंग हाडा, राव दलपत बुंदेला हे औरंगजेबाचे सरदार सहभागी असूनही सर्वांना उंदरगावच्या लढाईत पराभव स्वीकारावा लागला. झुल्फीकारखान घाबरून पिछाडीलाच थांबल्यामुळे जिवंत वाचला. झुल्फीकारने मात्र "आपण शंभर मराठे मारून युद्ध जिंकले' अशी खोटी बातमी हेरांमार्फत औरंगजेबला कळविली, परंतु नंतर उंदरगावातील अपमानास्पद पराभवाची खरी हकीकत गुप्तहेरांकडून कळताच औरंगजेबाने मावळ्यांची धास्ती घेत घाबरून ब्रह्मपुरीच्या छावणीभोवतीच फौजफाटा व रसद वाढवण्याचे आदेश दिले. मावळ्यांनी मात्र उंदरगावच्या मातीत झुल्फीकारखानाला पराभूत करीत, छत्रपतींच्या रायगडाला इजा पोचवल्याचा बदला घेतला. 

त्याकाळी उंदरगाव हा स्वतंत्र तालुका होता. तेव्हाच्या उंदरगाव तालुक्‍यात तब्बल 29 ते 31 गावे समाविष्ट असून "इंद्रगाव ऊर्फ उंदरगावपरगणाह' हा 1 लाख 250 रुपये आठ पैसे महसुलासह पूर्ण तालुका बराच काळ तारागढ व सांभर येथील घराण्याच्या दक्षिणेत आलेल्या वारसांपैकी रावप्रतापसिंह चव्हाणसांभरीराव व त्यांच्या मुलांच्या अमलाखाली असून ते शेवटपर्यंत स्वराज्यातर्फे लढले. "मांडवा-मांडोह परगणाह' अर्थात आताच्या माढा तालुक्‍यात 28 गावे समाविष्ट होती व महसूल 66 हजार 641 रुपये आठ पैसे होता. 

माढा व आसपासच्या तालुक्‍यांतील गावे म्हसवडच्या नागोजी मानेदेशमुखांना छत्रपती राजाराम महाराजांनी 1699 मध्ये देशमुखीत दिली होती. सन 1700 मध्येच मुतालीबखानाने रावप्रतापसिंहांची परांडा इलाख्यातील चकमकीत कपटाने हत्या घडवून आणली. सध्या रावप्रतापसिंहांची तेरावी पिढी उंदरगाव व माढा येथे राहात असून, गावगाड्यातील प्रमुख अधिकारी असलेले प्रमुख मानकरी वतनदार व जमीनदार नाईकवाडी, लवटे, सुतार, म्हस्के आदी नामवंत जमीनदार होते. 

या लढाईचा प्रसंग कोरलेल्या सात-आठ वीरगळी उंदरगावात असून त्यावर युद्ध करणारे योद्धे व ते युद्धात मरण पावल्यानंतर त्या योद्‌ध्यांच्या आत्म्याला स्वर्गात घेऊन जाताना स्वर्गातील दासी व सर्वात शेवटी कैलासात शिवलिंगाची उपासना करताना मरण पावलेल्या योद्‌ध्याचा आत्मा अशा तीन टप्प्यांत शिल्पपट कोरलेल्या वीरगळ असून, या योद्‌ध्यांची आठवण पुढील पिढ्यांना राहण्यासाठी वीरगळ कोरण्याची प्रथा प्रचलित होती, जी उंदरगावातील तेव्हाच्या समाजाने 25 जानेवारी 1700 रोजीच्या लढाईनंतर शिल्परूपातून जपल्यामुळेच आज ही शिल्पे सापडली व उंदरगावच्या लढाईचा इतिहास उजेडात आला. 

याबाबत माढा-उंदरगावचे इतिहास संशोधक मयूर चव्हाण म्हणतात, सोलापूर जिल्ह्यात औरंगजेब आला व पराभवाच्या अनेक वार्ता त्याने याच जिल्ह्यात ऐकल्या. झुल्फीकारखानाचीही मिजास "उंदरगावच्या लढाईत' धुळीस मिळून "रायगडाच्या अवमानाचा बदला घेणारी युद्धभूमी' अशी उंदरगावची व सीना नदीकाठाची स्वतंत्र ओळख आहे. या ऐतिहासिक घटनेच्या संशोधनासाठी मुगल दरबारचे औरंगजेबकालीन अखबार, मुगलांच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील शहाजहानकालीन व औरंगजैबकालीन साधने, पत्रव्यवहार आदींचा आधार घेतला असून, तालुक्‍यासह जिल्ह्यातील शिक्षकवृंदांनी हा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा. जिल्ह्यातील अनेक गावांत असणाऱ्या अशा ऐतिहासिक ठेव्याची निगा राखण्यात शासनाने पुढाकार घ्यावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com