वैरागमधील पाच जणांची टोळी तडीपार 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

वैराग (ता. बार्शी) येथील पाच जणांच्या टोळीस सोलापूर जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केल्याची माहिती वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली. 

 वैराग (जि. सोलापूर) ः वैराग (ता. बार्शी) येथील पाच जणांच्या टोळीस सोलापूर जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केल्याची माहिती वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली. 
वैराग शहर व हद्दीत हाणामारी, बेकायदेशीर जमाव जमवून भांडण करणे आदी प्रकारचे विविध असे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. अक्षय विलास अंधारे, आदिनाथ संतनाथ खेंदाड, प्रवीण संतनाथ खेंदाड, कादर युन्नूस ऊर्फ रसूल शेख, दीपक सुभाष माने (सर्वजण रा. वैराग, ता. बार्शी) अशी तडीपार पाच जणांची नावे आहेत. याबाबतचा अहवाल पोलिस प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडे सादर केला होता. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व टोळ्यावर वचक निर्माण होण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या पाच जणांना सोलापूर शहर वगळून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आल्याचे आदेश वैराग पोलिसांना दिले आहेत. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. काही महिन्यांवर वैराग ग्रामपंचायत निवडणूक येऊन ठेपली असून झालेली कारवाई निवडणूक काळात शांतता ठेवण्यासाठी झाल्याचे सांगण्यात आले. 
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्‍वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैरागचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कापसे यांनी ही कारवाई केली. 
वर्षभरात 23 जणांवर कारवाई 
गेल्या वर्षभरापासून वैराग पोलिस हद्दीतून 18 जणांवर तडीपारीची कारवाई केलेली आहे. त्यात या पाच जणांची भर पडली असून 23 जणांना तडीपार कारवाईस सामोरे जावे लागत आहे. आणखी काही टोळी माफियांवर महसूल व पोलिस प्रशासन याबाबत कारवाईच्या प्रयत्नात असल्याची माहिती सांगण्यात आली. 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action on gang of vairag