"येथे' होतोय पावसाचा एक थेंब पडला की वीजपुरवठा खंडित ! ग्राहकांमध्ये संताप

राजाराम माने 
Wednesday, 9 September 2020

केत्तूरसह पारेवाडी, पोमलवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी व राजुरीसह 11 ते 12 गावठाणांना पारेवाडी वितरण कंपनी कार्यालयामार्फत वीजपुरवठा केला जातो. या सर्वच गावांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज वितरण कंपनीला पावसाचे वावडे आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण, पावसाचा पहिला थेंब पडला की वीजपुरवठा खंडित होतो.

केत्तूर (सोलापूर) : उजनी लाभ क्षेत्रातील महत्त्वाचे समजले जाणारे पारेवाडी (ता. करमाळा) वीज वितरण कंपनी कार्यालयामार्फत वितरित केल्या जाणाऱ्या केत्तूरसह पारेवाडी, पोमलवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी व राजुरीसह 11 ते 12 गावठाणांना वीजपुरवठा गेल्या काही दिवसापांसून दिवस-रात्र खंडित होत आहे. यामुळे नागरिक तसेच व्यापारी व शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनी ग्राहकांना "तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार' देत असल्याचा प्रकार घडत आहे. 

हेही वाचा : कोरोना कधी जाशील रे, आम्हाला शाळेत जायचंय ! चिमुकल्यांनी लिहिल कोरोनाला पत्र 

केत्तूरसह पारेवाडी, पोमलवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी व राजुरीसह 11 ते 12 गावठाणांना पारेवाडी वितरण कंपनी कार्यालयामार्फत वीजपुरवठा केला जातो. या कार्यालयामार्फत 10 ते 12 गावे जोडली गेली आहेत. या सर्वच गावांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज वितरण कंपनीला पावसाचे वावडे आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण, पावसाचा पहिला थेंब पडला की वीजपुरवठा खंडित होतो. त्यातच सर्वच लाइन व तारा जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलणे गरजेचे आहे. 
गेल्या दोन वर्षांपासून हे डिव्हिजन व सर्कल शेवटी असल्याने दुर्लक्षित झाले आहे. 

पारेवाडी वीज वितरण कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता व कायमस्वरूपी कर्मचारीच नाहीत. सर्व कार्यालय झिरो कर्मचारी वर्गामार्फत चालवले जात आहे, त्यामुळे कोणतेही काम पूर्ण होत नाही. किरकोळ कामांनाही विलंब होत आहे. या कार्यालयासह जिंती, मांजरगाव येथील कार्यालयांतही यंत्र चालकांच्या बदल्या झाल्याने ही कार्यालये रामभरोसे चालू आहेत. कार्यालयातील झिरो कर्मचारी मात्र साहेबी थाटात वागत आहेत. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या कार्यालयासाठी कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता, यंत्रचालक तसेच गावठाणासाठी वायरमनची त्वरित नेमणूक करून परिसराला विनाखंड वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी व्यापारी, नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे. याकडे तालुक्‍याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी लक्ष घालून यात सुधारणा करावी अशी मागणी होत आहे. 

याबाबत केत्तूर येथील शेतकरी बापूसाहेब पाटील म्हणाले, शेतीसाठी मिळणाऱ्या आठ तासांचा वीजपुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देताना अडचणी येत आहेत. 

केत्तूरचे व्यापारी सुहास निसळ म्हणाले, गावठाणातील होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक तसेच व्यापारी त्रस्त झाले आहेत. कमीत कमी रात्री तरी वीजपुरवठा विनाखंड द्यावा. 

गृहिणी शुभांगी विघ्ने म्हणाल्या, सध्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिक उकाड्याने त्रस्त होत असताना वारंवार वीज खंडित होत असल्याने घरातील पंखे, कुलर बंद पडत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The power supply through Parewadi power company is always interrupted