कोरोना कधी जाशील रे, आम्हाला शाळेत जायचंय ! चिमुकल्यांनी लिहिले कोरोनाला पत्र 

तात्या लांडगे 
Wednesday, 9 September 2020

"सर्वजण कोरोनाला घाबरत आहेत, आई-बाबा घरात असतानाही ते आम्हाला जवळ घेत नाहीत. शाळेतील बाई मोबाईलवरच दिसतात. का रे कोरोना तू चीनमधून आमच्याकडे आलास? पाहुणा म्हणून आलास तर आता सहा महिने तरी तू जात नाहीस. माझी शाळा, माझे मित्र, शाळेचे मैदान माझी वाट पाहत आहे. आम्ही चिमुकले त्या ठिकाणी नसल्याने मैदानही सुनेसुने पडले आहे रे...' 

सोलापूर : "आईसोबत पहाटे उठायचो, नाश्‍ता करून डबा घेऊन बाबांसोबत तर कधी आईबरोबर शाळेत जायचो आम्ही. कधी स्वप्नातही वाटले नाही रे, तू येशील आणि आमचा आनंद हिरावून घेशील. आमचे आई-बाबा घरात असूनही आम्हाला कोरोना तुझ्यामुळे जवळ घेत नाहीत. सहा महिने होऊन गेले, आम्हाला मित्रांनाही भेटता आले नाही. शाळेतील बाईंचा मार, शाळेची इमारत, मैदान आमची वाट पाहत आहे रे... कोरोना कधी जाशील तू...' असे पत्र सिद्धेश्‍वर बाल मंदिरातील तिसरीच्या वर्गातील चिमुकल्यांनी कोरोनाला लिहिले आहे. 

हेही वाचा : ब्रेकिंग ! नगरसेवक कामाठीची बायकोही झाली पसार अन्‌ आता... 

"शाळा बंद अन्‌ ऑनलाइन शिक्षण सुरू' या उपक्रमाअंतर्गत मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जाऊ लागले. परंतु, चिमुकल्यांना आता त्याचा कंटाळा येत आहे. त्यामुळे आता "कोरोना गो बॅक' म्हणून त्यांनी पत्रे लिहिली आहेत. ते म्हणतात... "सर्वजण कोरोनाला घाबरत आहेत, आई-बाबा घरात असतानाही ते आम्हाला जवळ घेत नाहीत. शाळेतील बाई मोबाईलवरच दिसतात. का रे कोरोना तू चीनमधून आमच्याकडे आलास? पाहुणा म्हणून आलास तर आता सहा महिने तरी तू जात नाहीस. माझी शाळा, माझे मित्र, शाळेचे मैदान माझी वाट पाहत आहे. आम्ही चिमुकले त्या ठिकाणी नसल्याने मैदानही सुनेसुने पडले आहे रे... सारखा मोबाईल, टिव्ही पाहून पाहून खूप कंटाळा आलाय रे आम्हाला. आम्ही शाळेत सगळे मित्र गप्पा मारत मारत जेवायचो. आमचा रिक्षावाला काका दारात येऊन हाक मारायचा. पण कोरोना तुझ्यामुळे आम्ही सगळ्यांपासून दुरावत चाललो आहोत रे... नको नको झाला आहे रे आता मोबाईल... प्लीज कोरोना तू जा ना प्लीज.' अशी पत्रे तिसरीतील रोशन रामा राठोड, अथर्व धोंडप्पा स्वामी, आर्यन अर्जुन कोल्हापुरे, शिवम आनंद ढमामे, विवेक बिराजदार या चिमुकल्यांनी कोरोनाला लिहिली आहेत. 

हेही वाचा : "अण्णासाहेब'मुळे हमाली करणारा तरुण बनला व्यावसायिक ! पण... 

याबाबत श्री सिद्धेश्‍वर बाल मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमनी म्हणाल्या, शासनाच्या निर्देशानुसार कोरोना काळात मुलांचे ऑनलाइन क्‍लास सुरू आहेत. परंतु, त्याशिवाय विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, शब्द संपत्ती, वाचन-लेखन कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न सर्वजण करीत आहेत. पुस्तकांवर आधारित मुलांना अभ्यास दिला जातो आणि त्याचा आमचे शिक्षक नियमित पाठपुरावा करतात. शाळेतील शिक्षक विविध तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करीत आहेत. "कोरोनाला पत्र' या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी खूपच छान लेखन केले. 

सहशिक्षिका माधुरी थोन्टे म्हणाल्या, ऑनलाइन शिक्षणात ऑफस्क्रीन अभ्यासाद्वारेही मुलांना विविध उपक्रमांद्वारे त्यांची कल्पकता, रंजकता वाढावी म्हणून सहअध्ययन, प्रश्न तयार करणे, स्वतःचे अनुभव लिहिणे, परिसरातील गोष्टींचे निरीक्षण, घरातील व्यक्तींची मुलाखत, वर्तमानपत्रातील जोडाक्षरयुक्त शब्दसंग्रह असे उपक्रम राबवीत आहे. मुलांना कोरोनाविषयी काय वाटते, यासाठी "कोरोनाला पत्र' हा उपक्रमही राबविला. त्यातून त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढण्यास नक्की मदत होईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A letter to Corona was written by little children in Siddheshwar Bal Mandir