प्रहार शिक्षक संघटनेचा कोरोना सर्वेक्षणावर सोमवारपासून बहिष्कार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

सोलापूर ः शहरातील खासगी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक कोरोना सर्वेक्षण, ट्रेसिंग, टोल नाका, भाजी मंडई, क्वारंटाइन सेंटर याठिकाणी सहा महिन्यापासून काम करत आहेत. "माझे कुटूंब, माझी जबाबदारी'चे काम महापालिकेने शिक्षकांवर सोपविले आहे. शासन निर्णयात शिक्षकांचा उल्लेख नसतानाही सर्वेचे काम करुन घेतले जात आहे. शिक्षकांना कोरोना सेवेतून त्वरीत कार्यमुक्त करावे अन्यथा यावर उद्यापासून (सोमवार) बहिष्कार टाकण्याचा इशारा प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन नागटिळक यांनी दिला आहे. 

शिक्षकांना कोरोना सेवेतून कार्यमुक्त करण्याबाबत संघटनेने पत्रव्यवहार केला आहे. गेल्या सहा महिन्यापासून शिक्षक सर्वेक्षणाचे काम करत आहेत. काही ठिकाणी आरोग्य अधिकारी व त्यांच्या स्टाफकडून शिक्षकांना अत्यंत चुकीची वागणूक दिली जात आहे. सर्वेक्षणादरम्यान स्थानिक लोकांकडून शिक्षकांना शिवीगाळ करणे, मोबाईल हिसकावून घेणे, मारहाण करणे, यासारखे प्रकार घडत आहेत. 
कामावर असताना बरेच शिक्षक व त्यांचे कुटुंबिय कोरोनाबाधित होत आहेत. त्यांच्या दवाखान्याचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. शिक्षकांना काम करत असताना कोणत्याही प्रकारचा विमा दिला जात नाही. हा शिक्षकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. याचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ वाटप करणे, ऑनलाईन शिक्षण देणे, शिक्षकांना शाळेत विनाकारण बोलवून थांबवून घेण्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. शालेय कामकाज सांभाळून सर्वेक्षणाचे काम करावे लागत असल्याने आरोग्य अधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्या कचाट्यात शिक्षक भरडला जात आहे. शिक्षकांना कोरोना सेवेतून मुक्त न केल्यास यावर उद्यापासून (सोमवार) बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचेही नागटिळक यांनी सांगितले. यावेळी रियाजअहमद अत्तार, राजकुमार देवकाते, शहाजी ठोंबरे, सुदर्शन वऱ्हाडे, ज्ञानेश्‍वर गुंड उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prahar Teachers Union boycotts Corona survey from Monday