esakal | 'तौफिक' यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे 'प्रणितीं'चा हात ! पक्ष बदलावरून 'एमआयएम' नगरसेवकांत फूट
sakal

बोलून बातमी शोधा

3taufik_20shaikh_praniti_20shinde_20copy (2) - Copy.jpg

गटनेते म्हणाले, आम्ही तौफिकच्या पाठिशी पण पक्ष महत्त्वाचा 

शाब्दी यांच्याकडे जिल्ह्याची तर शहराची जबाबदारी तौफिक यांना देण्याची विनंती त्यांच्याकडे केली जाईल. पण, पक्ष सोडणे हा त्यावरील पर्याय नसून आपण तौफिक शेख यांना पुनर्विचार करावा, अशी विनंती केल्याचे एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

'तौफिक' यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे 'प्रणितीं'चा हात ! पक्ष बदलावरून 'एमआयएम' नगरसेवकांत फूट

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : 'एमआयएम'मधून तौफिक शेख यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली. पक्षाच्या जोडीला स्वत:च्या ताकदीने तौफिक यांनी मातब्बर उमेदवारांचा घाम काढला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत नऊ नगरसेवक विजयी करुन मतदारसंघात जम बसविला. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून तौफिक तुरुंगात गेले आणि फारुख शाब्दींचा शहरात प्रवेश झाला. पक्षाने त्यांना शहराध्यक्ष करीत शहर मध्यमधून विधानसभेची उमेदवारीही दिली. त्यामुळे नाराज तौफिक आता राष्ट्रवादीत जाणार आहेत. मात्र, तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने प्रणिती शिंदे यांच्या विजयातील मोठा अडसर दूर होईल आणि महेश कोठे यांनाही त्याचा फायदा होईल, अशी चर्चा आहे. 

गटनेते म्हणाले, आम्ही तौफिकच्या पाठिशी पण पक्ष महत्त्वाचा 
पक्षाने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली. त्यानंतर मतदारांनी पक्षाला पाहून मतदान केल्याने आम्ही महापालिकेपर्यंत पोहचलो. आता त्यांच्या मनाविरुध्द पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना धोका दिल्यासारखे होईल. त्यामुळे मी वैयक्‍तिक तौफिक शेख यांच्या पाठिशी आहे, परंतु पक्ष सोडणार नाही असे नगरसेविका वाहिदा शेख यांनी स्पष्ट केले. तर आता पक्ष सोडण्याची काहीच गरज नसून तौफिक शेख यांची नाराजी दूर करण्यासाठी सर्वच नगरसेवक पक्षप्रमुखांशी बोलतील. शाब्दी यांच्याकडे जिल्ह्याची तर शहराची जबाबदारी तौफिक यांना देण्याची विनंती त्यांच्याकडे केली जाईल. पण, पक्ष सोडणे हा त्यावरील पर्याय नसून आपण तौफिक शेख यांना पुनर्विचार करावा, अशी विनंती केल्याचे एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 


सोलापूर शहरात एमआयएमची ताकद वाढविण्यात आणि पक्षाचा पसारा वाढविण्यात तौफिक शेख यांचा मोठा हात आहे. त्यांनी आपली ताकद वापरून शहरात प्रथमच दाखल झालेल्या पक्षाला बळ दिले. त्यांनी समाजावरील अन्याय दूर करण्याच्या हेतूने पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचविली. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या ताकदीवर सुकर होणारा प्रणिती शिंदे यांचा आमदारकीचा रस्ता कठीण बनला. त्यातच मागील विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी आपली ताकद आजमाविण्याचा प्रयत्न शहर मध्य मतदारसंघातून केला. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला. मात्र, तौफिक शेख हे आता राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर राज्यातील सत्तेची समिकरणे पाहता त्याचा सर्वाधिक लाभ आमदार प्रणिती शिंदे यांनाच होईल, अशीही चर्चा आहे. तौफिक शेख हे नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. मात्र, आपण मतदारांचा विश्‍वासघात करणार नसून पतंग सोडून आपण हातात घड्याळ घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.