गरोदर मातांसाठी ! कुपोषणावर निघाला इलाज 

तात्या लांडगे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

एप्रिलपासून दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये बदल 
राज्य कुपोषणमुक्‍त करणे, राज्यातील माता व बालमृत्यू कमी करण्याच्या हेतूने आता दूरचित्रवाणीवरील मराठी व हिंदी मालिकांच्या माध्यमातून गरोदर मातांना संगोपनाची माहिती (मेसेज) दिली जाणार आहे. एप्रिलपासून दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये बदल दिसून येईल. 
- जामसिंग गिरसे, उपायुक्‍त, आरोग्य व कुपोषण, मुंबई 

सोलापूर : राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि उपजत मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून गरोदर मातांना संगोपनाची माहिती दिली जाणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला असून त्यासाठी सुमारे 50 कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे. एप्रिलपासून या नव्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : दहावी-बारावी परीक्षेची दैनंदिन माहिती आता ऑनलाइन 

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागासह सरकारने कुपोषण कमी करणे, माता, बाल मृत्यू कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी हजारो कोटींचा खर्चही केला, मात्र म्हणावे तितके कुपोषण कमी झालेले नाही. दरम्यान, ग्रामीण असो की शहरी भागातील गरोदर महिला, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, तरुण रात्रीच्या वेळी तथा निवांतवेळी दूरचित्रवाणीवरील मालिका पाहतात. बहूतेक महिला मालिकेतील नायिकेचे अनुकरण करतात, असे निरीक्षण महिला व बालकल्याण विभागाने नोंदवले. त्यानुसार आता दूरचित्रवाणीवरील मराठी व हिंदी मालिकांच्या माध्यमातून गरोदर महिलांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी, एक हजार दिवस मुलांचे संगोपन कसे करायचे, सहा महिन्यांपर्यंत बालकांचे स्तनपान याची माहिती दिली जाणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याला मान्यता दिली आहे. त्यानुसार हिंदी व मराठी मालिकांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांना मार्चमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : शिक्षण संचालकांचे पत्र बेदखल 

ठळक बाबी... 

  • राज्यातील कुपोषण कमी करुन बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी नवा प्रयोग 
  • मार्चमध्ये मराठी व हिंदी मालिकांच्या लेखकांना दिले जाणार प्रशिक्षण 
  • एप्रिलपासून सरकारच्या निर्देशानुसार दूरचित्रणावरील मालिकांमध्ये दिसणार बदल 
  • महिला व बालकल्याण विभागाच्या नव्या प्रयोगासाठी होणार सुमारे 50 कोटींपर्यंत खर्च 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pregnant mothers GOOD NEWS Cure for malnutrition