जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी 

Rain in Solapur
Rain in Solapur

सोलापूर : मृग नक्षत्रात बरसलेल्या सरीने वातावरणातील उष्णता कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला. शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला असून शेतकरी वरुणराजाच्या येण्याने सुखावला आहे. जिल्ह्यातील माढा, बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोटसह पांगरी, पानगाव, उपळाई बुद्रूक, पिंपळनेर, रानमसले, मसले चौधरी, वळसंग, मळेगाव, अंजनगाव खेलोबा यासह जिल्ह्यात पाऊस झाला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. रात्री 11:30 पर्यंत सोलापूर शहर व परिसरात 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

बार्शी शहर व परिसरात हजेरी 
बार्शी :
बार्शी शहर व परिसरात मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांत पावसाने उघडीप दिल्यानंतर नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. रात्री साडेआठच्या दरम्यान रिमझिम पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. साडेनऊ ते 10:15 पर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. नंतर रात्री 11 पर्यंत रिपरिप होती. वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला होता. ढगाळ वातावरण असल्याने रात्रभर पाऊस असेल असे वाटते. शहरासह तालुक्‍यात पाऊस सुरूच होता. 

खरिपाच्या आशा पल्लवीत 
पानगाव :
यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने पानगाव (ता. बार्शी) परिसरात रात्री जोरदार हजेरी लावली. मृग नक्षत्राला रविवारी प्रारंभ झाला असून तेव्हापासून शेतकरी पेरणीसाठी मोठ्या पावसाची वाट पाहत होते. त्यातही काल दिवसभर पावसाचे कोणतेही वातावरण नव्हते. परंतु सायंकाळी सातपासून पावसाचे वातावरण तयार होऊन रात्री पावणेनऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीबाबत वाढत चाललेली काळजी काही अंशी कमी झाली आहे. 


पांगरी परिसरात हजेरी 
पांगरी :
पांगरी परिसरात आज सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्‍याशा पावसाचे रूपांतर वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन जोरदार सरी कोसळल्या. आज सकाळपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. त्यात दिवसभर विद्युतप्रवाह खंडित असल्याने उकाडा असह्य झाला होता. सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. खरीप पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी राजा पावसाची वाट पाहत होता. मागील चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने ममदापूर (ता. बार्शी) परिसरात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस सुरवात केली होती. मात्र, पांगरी परिसरात आजच्या झालेल्या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून खरीप पेरणीसाठी एक दमदार पाऊस पडणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. मृग नक्षत्रातील खरीप पेरणी फायद्याची ठरत असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा :  ज्येष्ठ वकील, गिरणी कामगारासह सोलापुरात तिघांचा मृत्यू
 
नरखेड परिसरात हजेरी 
नरखेड :
नरखेड (ता. मोहोळ) परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने ब्बल तीन दिवसांनी उशिरा हजेरी लावली. आज दिवसभर कडाक्‍याचे ऊन व असहाय्य उकाडा होता. परंतु, संध्याकाळी नऊ वाजता पावसाला विजांच्या कडकडाटासह सुरवात झाली. खरिपाच्या पेरणीसाठी शिवार व शेतकरी मोसमी पावसाची वाट चातकासारखे पाहत होता. परंतु, आज संध्याकाळी पावसाला सुरवात झाली असून या पावसामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या तयारीला लागणार आहे. खरिपाच्या पेरणीपूर्वी योग्य वेळी पाऊस पडल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.
 

अक्कलकोट येथे मुसळधार पाऊस 
अक्कलकोट :
मृग नक्षत्राचा पाऊस अक्‍कलकोट शहरात मुसळधार तर तालुक्‍यात दमदार स्वरूपाचा झाला आहे. आज सायंकाळनंतर अचानक आभाळ भरून आले. आज रात्री आठ वाजता अक्कलकोट शहरात मुसळधार पावसाला सुरवात झाली. तो साडेनऊपर्यंत सुरूच होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नागरिक सुखावलेले दिसले. त्याचप्रमाणे दोड्याळ, जेऊर, करजगी, नागणसूर, मैंदर्गी, हन्नूर, बादोले, हिळ्ळी, बोरगाव (दे.), किणी, चुंगी आदी भागात अर्धा ते सव्वा तास दमदार पावसाची नोंद झाली. यामुळे आता खरीप पेरणीच्या दृष्टीने पाऊस होत आहे. आणखी एक-दोन पाऊस मोठे झाल्यास पुरेशी ओल होऊन पेरणी सुकर होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com