esakal | Marathi News Latest & Breaking | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या | eSakal.com
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

शहरातील महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाच्या 58 शाळांमधील पटसंख्या पाच हजारांपर्यंत आहे. तर माध्यमिक शिक्षणाच्या सहा शाळांमधील पटसंख्या सोळाशेपर्यंत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ अठराशे पालकांकडेच अँड्रॉईड मोबाइल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे दोन हजार 400 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधे मोबाईल असून आठशे पालकांकडे मोबाईलच नसल्याचे उघड झाले. 

धक्कादायक वास्तव! "येथील' मुलांना तीन महिन्यांनंतरही मिळेना शिक्षण 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या शहरात प्राथमिक आणि माध्यमिकच्या 64 शाळा असून, त्यामध्ये एकूण साडेसहा हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यामध्ये उर्दू माध्यमाच्या 22, मराठी माध्यमाच्या 30, कन्नड माध्यमाच्या तीन, तेलुगु माध्यमाच्या दोन आणि इंग्रजी माध्यमाची एक शाळा आहे. माध्यमिकच्या पाचवी ते दहावीपर्यंत सहा शाळा आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे, या शाळांमधील एक हजार 800 विद्यार्थ्यांच्या पालकांकडेच अँड्रॉईड मोबाइल असून, उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधे मोबाईल आहेत किंवा काहींकडे मोबाईलच नसल्याने हे विद्यार्थी अद्यापही शिक्षणापासून दूरच आहेत. 

हेही वाचा : अर्रार्र! पोलिसांनाच पडला हद्दीचा प्रश्‍न; जुगारावरील कारवाईदरम्यान इमारतीवरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू 

शहरातील महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाच्या 58 शाळांमधील पटसंख्या पाच हजारांपर्यंत आहे. तर माध्यमिक शिक्षणाच्या सहा शाळांमधील पटसंख्या सोळाशेपर्यंत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ अठराशे पालकांकडेच अँड्रॉईड मोबाइल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे दोन हजार 400 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधे मोबाईल असून आठशे पालकांकडे मोबाईलच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील 203 शिक्षकांना प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांची जबाबदारी देऊन त्यांचा नियमित अभ्यास घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. पुस्तके देऊनही विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नसल्याचेही चित्र आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून टॅब द्यावेत, जेणेकरून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यातील शिक्षणाची गोडी टिकवून ठेवण्यास मदत होईल, असा प्रस्ताव शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी कादर शेख यांनी महापालिकेसमोर ठेवला आहे. मात्र, महापालिकेने अद्याप काहीच निर्णय घेतला नसून, त्यावर केवळ चर्चा झाली आहे. 

हेही वाचा : विठ्ठल मंदिर आंदोलनावर बहुजन वंचित आघाडी ठाम; ऍड. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करणार आंदोलन 

टॅब उपलब्ध करण्याचा प्रयत्न 
महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख म्हणाले, महापालिकेच्या शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधे मोबाईल तथा मोबाईलच नाहीत, अशांना टॅब द्यावेत, असा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर चर्चा झाली आहे, परंतु निर्णय झालेला नाही. स्मार्ट सिटीतून तथा सीएसआर फंडातून टॅब उपलब्ध होतील का, याचीही चाचपणी केली जात आहे. 

महापालिका शाळांची स्थिती 

  • एकूण शाळा : 64 
  • एकूण प्रवेशित विद्यार्थी : 6,090 
  • मोबाईल नसलेले पालक : 930 
  • साधे मोबाईलधारक पालक : 3,900 
  • टॅबची मागणी : 5000 
  • टॅबसाठी निधीची मागणी : 2.50 कोटी 

शिक्षकांना ड्यूटी कोरोनाची म्हणून... 
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी "गुरुमंत्र' हा उपक्रम राबविला जात होता. मात्र, आता त्याची मुदत 31 मे रोजी संपुष्टात आली आहे. दरम्यान, शहरातील कोरोना सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली असून 30 दिवस त्यांना ते काम करणे बंधनकारकच आहे. त्यामुळे बहुतांश शिक्षकांना त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचताच आले नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांनी आता स्वतंत्र यू-ट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तयार केले असून त्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. मात्र, ते व्हिडिओ पाहण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल तथा टॅब आवश्‍यक आहेत. त्यावर आता महापालिकेच्या निर्णयाची उत्सुकता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

go to top