खासगी दूध संघ चालकांची मनमानी; तब्बल 12 रूपयांनी दर केले कमी 

भारत नागणे
Sunday, 19 April 2020

12 रूपयांनी दर कमी केले 
बारामती येथील एका खासगी दूध संघाने मागील 20 रुपये प्रती लिटर दराने पैसे जमा केले आहेत. मागील दहा दिवसापूर्वी गाईच्या दूधाला 32 रुपये दर होता. यावेळी मात्र 12 रुपयांनी दर कमी केले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या संघाला आमच्या केंद्रातून प्रती दिन सात हजार 500 लिटर दूध पुरवठा केला जातो. सरकारने 25 रुपयापेक्षा कमी दराने दूध खरेदी करुन नका, असे आदेश काढलेले असताना देखील खासगी दूध संघ शेतकऱ्यांची आर्थिक लूट करु लागले आहेत. 
- साहेबराव नागणे, चेअरमन, हनुमान दूध संकलन केंद्र, उपरी, ता. पंढरपूर 

पंढरपूर (जि. सोलापूर) : लॉकडाऊनमुळे शेतीसह शेती पुरक व्यवसाय संकटात आले आहेत. वाहतूक आणि बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे. अशातच शेतीपूरक दूध धंदाही संकटात आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली खासगी दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लुट सुरु केली आहे. गेल्या आठ दिवसामध्ये तब्बल प्रती लिटर 12 रुपयांनी दर कमी केले आहेत. सध्या 32 रुपयांवरुन थेट 20 रुपये प्रती लिटर दराने दूधाची खरेदी सुरु केली आहे. शेतकरी संकटात असताना लॉकडाऊनच्या नावाखाली लूट करणाऱ्या खासगी दूध संस्थांवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्हा सहकारी दूध संघ अडचणीत असल्यामुळे सर्रास शेतकऱ्यांचे दूध विविध खासगी संस्थांना दिले जाते. लॉकडाऊनच्या पुर्वी प्रती लिटर गाईच्या दूधाला 30 ते 32 रुपये तर म्हशीच्या दूधाला 35 ते 40 रुपयांच्या पुढे भाव मिळत होता. कोरोनाच्या संकटानंतर मात्र दूध दरात कपात झाली. वाहतूक आणि बाजारपेठा बंद असल्याने खासगी संस्थांनी दूधाचे दर कमी केले होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कमीत कमी 25 रुपये दराने दूधाची खरेदी करावी, अशा सूचना खासगी व सहकारी दूध संस्थांना दिल्या आहेत. तरीही अनेक खासगी दूध संस्थांची दूर दराबाबतची मनमानी अजूनही सुरुच आहे. 
पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या खुशीत उभारलेल्या एका खासगी दूध डेअरीने गाईच्या दूधाला प्रती लिटर 20 रुपयांचा भाव दिल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये दूध पुरवठा केलेल्या दूधला या संघाने प्रती लिटर 20 रुपये प्रमाणे पैसे जमा केले आहेत. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचीच लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private milk union operators arbitrarily lower rates by Rs 12