दातृत्वाची प्रचिती; दिव्यांगांनी केली दिव्यांग बांधवांची मदत 

अभय जोशी 
शुक्रवार, 22 मे 2020

14 हजार रूपये मदत जमा 
केवळ दोनच दिवसात सर्व दिव्यांग बांधवांनी तब्बल 14 हजार रुपये जमा झाले. अंशतः अंध असलेल्या संभाजी खिलारी या विद्यार्थ्याने गुगल पे अकाउंटवरून ऑनलाइन ही रक्कम अडचणीत आलेल्या काही दिव्यांग कुटुंबांना पाठवली. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : येथील अंध शाळेत शिक्षण घेऊन प्रपंचासाठी काही ना काही व्यवसाय, उद्योग करणारे दिव्यांग बांधव कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अडचणीत आले होते. अशा दिव्यांगांना अन्य दिव्यांगांनी मोलाची मदत करून आपले दातृत्व दाखवून दिले आहे. 
कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांचे रोजगार, उद्योग बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत अडचणीत आलेल्या या लोकांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अगदी सामान्य परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांपासून ते समाजातील विविध स्तरातील लोक पुढे येत आहेत. कोणी पंतप्रधान सहायता निधीसाठी तर कोणी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्याला शक्‍य होईल, ती मदत पाठवत आहे. कोणी आपल्या गावातील आणि परिसरातील गरजूंना शक्‍य होईल ती मदत करीत आहे. तशाच पद्धतीने काही दिव्यांगांनी अडचणीत आलेल्या आपल्या अन्य काही दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोलाची मदत करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 
पंढरपूर येथील अंध शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अनेक अंध स्वावलंबी झाले आहेत. काही दिव्यांग मुंबईतील लोकलमध्ये तसेच राज्याच्या विविध गावांमधील एसटी स्टॅंडवर खेळणी, मोबाईल कव्हर अशा प्रकारच्या वस्तू विकून आपले आणि आपल्या कुटुंबियांचे पोट भरतात. 
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अशा लोकांना वस्तू विकून मिळणारे चार पैसे मिळणे बंद झाले आहे. अडचणीत आलेल्या या दिव्यांगांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार अंधशाळेच्या अन्य काही माजी विद्यार्थ्यांच्या मनात आला. शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शोभा माळवे, मुख्याध्यापिका सुजाता पाटील तसेच शाळेतील अन्य शिक्षक शिक्षिका यांनी शाळेत शिक्षण घेऊन नोकरी उद्योग करणाऱ्या काही दिव्यांगांना संपर्क साधला आणि मग प्रत्येकाने अडचणीत आलेल्या दिव्यांगांच्या मदतीसाठी काही ना काही खारीचा वाटा उचलण्याची तयारी दर्शवली. 
केवळ दोनच दिवसात तब्बल 14 हजार रुपये जमा झाले. अंशतः अंध असलेल्या संभाजी खिलारी या विद्यार्थ्याने गुगल पे अकाउंट वरून ही रक्कम अडचणीत आलेल्या काही दिव्यांग कुटुंबांना पाठवली. 
संभाजी खिलारी, संतोष जाधव, सोमनाथ घाडगे, परमेश्वर क्षीरसागर, बिरू वाघे, दिपक गाजरे, विलास शिंदे, सौरभ चौगुले, आनंद प्रक्षाळे, माजी मुख्याध्यापिका शोभा माळवे, मुख्याध्यापिका सुजाता पाटील, कुलकर्णी, घोडके, म्हैत्रे, सीमा अवसेकर, प्रतिक्षा कांबळे, राहुल ढाळे, संजय म्हैत्रे आदींनी या मदतीत आपल्यापरीने खारीचा वाटा उचलला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proof of generosity helping the handicapped