अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत द्या 

उमेश महाजन
Thursday, 24 September 2020

अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन फंडातून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनास केल्या 

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूदसह परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेती, फळबागा यांच्यासह सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत. कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या आहेत. 
गेल्या आठवड्यामध्ये महूदसह परिसरातील कटफळ, इटकी, अचकदाणी, वाकी, शिवणे, चिकमहूद, महिम, लक्ष्मीनगर, खिलारवाडी, गायगव्हाण आदी गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच या परिसरातील कासाळगंगा ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज महूद परिसराचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला विविध सूचना केल्या. यावेळी त्यांनी महूद-महिम रोड वरील खंडोबा मंदिराजवळील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पुलाची तसेच सचिन यलमर यांच्या नुकसान झालेल्या डाळींब बागेची पाहणी केली. पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता अशोक कंटीकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री. मुलगीर, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष जयमाला गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, ग्रामपंचायत सदस्य ऍड. धनंजय मेटकरी, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, परमेश्वर कोळेकर, दिगंबर लवटे, चंद्रकांत सरतापे, मंडलाधिकारी दिनेश भंडगे, ग्रामसेवक विनायक कोळी, तलाठी गणेश भुजबळ आदी उपस्थित होते. 
या प्रसंगी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना, अखिल भारतीय सरपंच परिषद व ग्रामपंचायत महूद यांच्यावतीने सरपंच बाळासाहेब ढाळे, तालुकाध्यक्ष दिपक गोडसे यांनी शेती व फळपिकांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, सांगोल्यात कोविड रूग्णालय सुरू करावे, पुराच्या पाण्यामुळे महूद-महिम रोडवरील खंडोबा मंदिर जवळील वाहून गेलेला पूल, महूद-गार्डी रोडवरील बौद्ध स्मशानभूमी जवळील वाहून गेलेला पूल, बौद्ध दहनभूमीतील संरक्षक भिंत व पेवर ब्लॉक, महूद हिंदू स्मशानभूमी जवळून ठोंबरे वस्तीकडे जाणारा वाहून गेलेला पूल, महूद-अकलूज रोड वरील मोठा पूल, महूद गाव व बेघर वस्ती परिसरातील 60 ते 70 घराची झालेली पडझड या सर्वांची तात्काळ दुरुस्ती करावी व मदत मिळावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्‍यक ते साहित्य पुरवण्यात यावे. महिला बचत गटाची व इतर बॅंकाची सक्तीची कर्जवसुली त्वरित थांबवणे यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले. 
पुराच्या पाण्यामुळे महिम गावाशी जोडलेले सर्व पूल निकामी झाले आहेत. त्यामुळे महिमचा इतर गावांशी संपर्क तुटलेला आहे. तेव्हा महिमला जोडणारे सर्व पूल तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी परमेश्वर कोळेकर व महिम ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide immediate relief to those affected by heavy rains and floods