अक्कलकोटमध्ये आजपासून गुरुवारपर्यंत जनता कर्फ्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासकीय अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली आणि त्यात 24 ते 28 मे असे पाच दिवस जनता कर्फ्यू पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दूध आणि औषध वगळता इतर व्यवहार बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. 

अक्कलकोट ः अक्कलकोटला मधला मारुती परिसरात एका व्यक्तीचा कोरोना अहवाल तो मृत झाल्यानंतर पॉझिटिव्ह आल्याने आज तातडीने सर्व व्यवहार बंद झालेले दिसले. त्यात आज एक किलोमीटरपर्यंत प्रतिबंधित झोन तर तीन किलोमीटर बफर झोन जाहीर झालेला आहे. यात शहराचा सर्वच परिसर समाविष्ट होत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाबरोबर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासकीय अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली आणि त्यात 24 ते 28 मे असे पाच दिवस जनता कर्फ्यू पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दूध आणि औषध वगळता इतर व्यवहार बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. 

जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार कल्याणशेट्टी यांनी केले. ते म्हणाले, शहराला कोरोनापासून सुरक्षित ठेवायचे असेल तर कोणीही घराबाहेर पडू नये. नागरिकांना एकत्रित करावे लागणारे कार्यक्रम टाळावे आणि यासाठी स्वतःहून सर्वांनी पुढाकार घ्यावा. 

तहसीलदार अंजली मरोड म्हणाल्या, अक्कलकोटला आढळलेला कोरोना रुग्ण हा मृत झालेला आहे. आता ही साखळी तोडण्यासाठी पाच दिवस अक्कलकोटला बाहेरून कोणीही बाहेरून येणार नाही अथवा कोणीही बाहेर जाणार नाहीत. या काळात फक्त काही औषध दुकाने आणि दूध ही सेवा सकाळच्या वेळी ठरलेल्या वेळेत चालू राहील. 

प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी अक्कलकोटला बफर आणि कंटेन्मेंट झोन जाहीर केल्याने त्याचे सर्व नियम हे लागू झालेले आहेत. आता संबंधित मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती ट्रेसिंग करायची आहे. यासाठी संबंधितांनी वाट न पाहता स्वतःहून रिपोर्टिंग करावे आणि नागरिकांनी आता पूर्वीपेक्षा अधिक सजगतेने वावरणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड म्हणाले, अक्कलकोटकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणालाही शहरात येणे अथवा बाहेर जाणे शक्‍य नाही. फक्त मेडिकलसह अत्यावश्‍यक सेवांसाठी सीमा काही वेळांसाठी खुल्या असतील. सर्वांनी लॉकडाउन नियम आणि कोरोना प्रतिबंध नियम पाळावेत. 

मुख्याधिकारी आशा राऊत म्हणाल्या, शहरातील लोकमंगल सुपर बझार, लोकमान्य सुपर बझार, ममता सुपर बझार, फूड झोन व श्री ट्रेडर्स ही पाच दुकाने फक्त किराणा मालासाठी घरपोच सेवा देतील. कोणीही वस्तू घ्यायला या दुकानात जायचे नाही. ग्रामीण भागातील लोकांनीही अगदीच आवश्‍यक असेल तेव्हाच शहरात यावे. याची खबरदारी अक्कलकोट शहरसह तालुक्‍यातील नागरिकांनी घ्यावी.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public curfew in Akkalkot on Sunday