पुणे "शिक्षक'चे उमेदवार दत्तात्रेय सावंतांच्या गाठीभेटी आल्या चर्चेत 

प्रमोद बोडके
Saturday, 21 November 2020

"महाविकास'च्या नात्यासाठी महत्वाची निवडणुक 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांशी संबंधित असलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक मतदार उघडपणे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासाठी प्रचार करू लागले आहेत. माजी आमदार सावंत यांनी या मतदारसंघातून पुन्हा आमदार होण्यासाठी सुक्ष्म रणनिती आखली आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस सावंत यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील होती. तशी बोलणीही सुरु झाली होती. कॉंग्रेसने या मतदार संघातून अचानकपणे जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर केली. कॉंग्रेसच्या या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विशेषता राष्ट्रवादीची राजकिय कोंडी झाली आहे. त्यामुळे शिक्षक मतदार संघातील या निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडी सरकारसाठी महत्वाचा असणार आहे. या मतदार संघातून कॉंग्रेस पराभुत झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. पुणे शिक्षक मतदार संघातील या निवडणुकीचा निकालच राज्याच्या महाविकास आघाडीत भविष्यात बिघाडी करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर : साहेब तुम्ही तुमच्या इलेक्‍शनला आम्हाला हक्काने सांगा. पुणे शिक्षक मतदार संघातील ही आमची निवडणूक आहे. आम्हाला आमच्या हक्काचा शिक्षक आमदार निवडून देण्याची संधी द्या अशीच भुमिका सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक मतदार घेऊ लागले आहेत. शिक्षक ज्या संस्थेत काम करतात त्या संस्था चालकांना व आजी-माजी आमदारांना शिक्षक उघडपणे सांगू लागल्याने विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदार संघातील रंगत आणखीणच वाढू लागली आहे. 

कधी नव्हे ते शिक्षकांनी घातलेल्या साकड्याला संस्थाचालकही अप्रत्यक्षपणे मोकळीक देऊ लागले आहेत. माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आमदारकीच्या मागील टर्ममध्ये दत्तात्रेय सावंत यांनी कायम विना अनुदानितच्या शिक्षकांसाठी व संस्थांसाठी केलेल्या भरीव कामगिरीचा मोठा लाभ सावंत यांना होण्याची शक्‍यता आहे. या कामगिरीमुळेच दत्तात्रेय सावंत पुन्हा आमदार होतील असाच विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले आहेत. साधी राहणी, प्रत्येकाला आपलेसे करुन घेणारी वाणी आणि आणि हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रचंड पाठपुरावा करण्याची असलेली क्षमता या मुळे दत्तात्रय सावंत हे सर्वसामान्य शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. 

शिक्षक मतदार संघातून सावंत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटीचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे सावंत यांच्या या गाठीभेटी चर्चेत आल्या आहेत. शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडीने कोल्हापुरातील जयंत आसगावकर यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा कॉंग्रेस लढवत आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. जिल्ह्यातील बहुतांश नेते आणि संस्थाचालक हे माजी आमदार सावंत यांच्यासोबतच राहण्याची दाट शक्‍यता आहे. 

कॉंग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, होटगी मठ संस्थेचे चेअरमन डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, रिपाईच्या आठवले गटाचे नेते राजाभाऊ सरवदे यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षण संस्थाचालकांची वैयक्तिक भेट माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी घेतली आहे. आमदारकी मिळाल्यानंतरही माजी आमदार सावंत यांनी कोणत्याच तालुक्‍याच्या राजकारणात थेट हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे त्या - त्या तालुक्‍यातील सर्वपक्षिय नेत्यांमध्ये सावंत यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune "Teacher's" candidate Dattatreya Sawant's meeting was discussed