असंही प्रेम ! गायीच्या डोहाळे जेवणानिमित्त उठली गावाची पंगत 

Cow
Cow

बार्शी (सोलापूर) : एखाद्या कुटुंबामध्ये नवीन पाहुणा (बाळ) येणार आहे म्हटलं की कुटुंबासह पै - पाहुण्यांचा आनंद गगनात मावत नाही. बाळ होणाऱ्या मातेचे औक्षण करून डोहाळे जेवण देऊन मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. पण बार्शीत मात्र आगळा - वेगळा सोहळा पाहायला मिळाला. चक्क गायीच्या पहिल्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात पै- पाहुण्यांबरोबरच गावातील लोकांनाही आमंत्रित करण्यात आलं व त्यांना मिष्टान्न जेवणही देण्यात आलं. आपल्या घरातील पशूंबद्दल प्रेम व्यक्त करत अनभुले कुटुंबीयांनी समाजाला एक वेगळा संदेश दिल्याने शहरात त्यांचे कौतुक होत आहे. 

कासारवाडी (ता. बार्शी) येथील रमेश अनभुले यांना 26 एकर शेती असून, ते पिढ्यान्‌ पिढ्या शेती व्यवसाय करीत आहेत. त्यांचे घरातील सदस्यांप्रमाणेच पशुधनावरही प्रेम आहे. शहरी भागात पशुधन ठेवण्यासाठी अडचण येत असतानाही त्यांनी अलीपूर रस्त्यावर स्वतःच्या घरासमोर गाईंचे संगोपन सुरू ठेवले आहे. त्यांच्याकडील एक गाय पहिल्यांदाच गाभण राहिल्याने व गाईस वासरू होणार असल्याचा आनंद कुटुंबाला गगनात मावेना अन्‌ रमेश अनभुले, त्यांची पत्नी स्वाती अनभुले, मुले समर्थ व आनंद यांनी गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम धूमधडाक्‍यात साजरा करण्याचे ठरवले. 

नवीन वर्षाची सुरवात आणि आनंदाचा क्षण म्हणून कुटुंबाने शेजारी राहणारे, त्या भागातील सुवासिनी, पै - पाहुणे जमा करून गोमातेला हारतुरे घालून सजवले. मिष्टान्न तयार केले व फळे मांडून गोमातेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. गाईचे खण - नारळाने ओटी भरून, औक्षण व पूजाही करण्यात आली. आलेल्या सर्व जणांना भोजनाचा आस्वाद दिला. 

समाजामध्ये गायीवरील श्रद्धा, गायींचे आपल्या जीवनातील स्थान स्थान तसेच गायीपासून मिळणारे फायदे आरोग्यासाठी उपायकारक असून कुटुंबाचे पशुधनावर प्रेम आहे. मानवाप्रमाणे गोमातेचे रक्षण झाले पाहिजे, असा संदेश समाजापुढे ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. 
- स्वाती अनभुले,
गृहिणी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com