बार्शीतील 20 हजार कुटुंबांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे नियोजन 

प्रशांत काळे 
Thursday, 10 September 2020

मार्केट यार्डमध्ये 1600 व्यापाऱ्यांची तपासणी केली असता 110 जण पॉझिटिव्ह तर बाजारपेठेतील 3500 व्यापाऱ्यांची तपासणीमध्ये 125 जण कोरोनाबाधित आढळले आहेत, असेही त्यांनी सांगितले. पॉझिटिव्ह रूग्ण होम क्वारंटाइनमध्ये असताना शहरात फिरत असतील तर शेजाऱ्यांनी पालिकेला याची माहिती द्यावी. प्रत्येकाची लक्षणे वेगळी आहेत. आजार आवाक्‍याबाहेर जाण्यापूर्वीच नागरिकांनी काळजी घ्यावी. तपासणी करुन घेऊन पालिकेस सहकार्य करावे, असे दगडे-पाटील यांनी स्पष्ट केले. 

बार्शी (सोलापूर) : शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असून काही प्रभाग तर हॉटस्पॉट झाले आहेत. सुमारे 20 हजार कुटुंबांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्याचे नियोजन पालिकेने केले असून नागरिकांनी स्वतःहून तपासणी करावी. अन्यथा पालिकेचे कर्मचारी नोटीस देऊन दंडात्मक कार्यवाही करतील, अशी माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
दगडे-पाटील म्हणाल्या, शहरातील व्यापारी, भाजीविक्रेते, बांधकाम मजूर, नोकरदार, दूधवाले, सलून, किराणा व्यापारी, रेशन दुकानदार यांची तपासणी करावीच लागणार आहे. बाजारपेठेत व्यापारी सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या नियमावलीचे उल्लंघन करताना दिसत असून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शहर व इतर तालुक्‍यात बार्शी येथून कोरोनाचा फैलाव होताना दिसत असून सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोंबरअखेर दररोज 600 जणांच्या टेस्ट घेण्याचे नियोजन आहे. पॉझिटिव्ह आल्यास होम क्वारंटाईन करण्यात येईल. त्यासाठी पालिकेने कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता यांनी विशेष दक्षता घेण्याची गरजेचे असून वेळ न घालवता थोडा जरी त्रास झाला तरी त्वरीत रुग्णालयांशी संपर्क साधावा. कोरोनाला सहजा-सहजी घेऊ नये. शहरातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 16, 17, 20 यामध्ये रुग्णांची मोठी संख्या असून बरे होऊनही गेले आहेत. स्वतंत्र कंट्रोल रुमची व्यवस्था करण्यात आली असून ज्या रुग्णालयात बेड शिल्लक आहेत त्याची माहिती तेथे मिळेल. येथे तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. 
मार्केट यार्डमध्ये 1600 व्यापाऱ्यांची तपासणी केली असता 110 जण पॉझिटिव्ह तर बाजारपेठेतील 3500 व्यापाऱ्यांची तपासणीमध्ये 125 जण कोरोनाबाधित आढळले आहेत, असेही त्यांनी सांगितले. पॉझिटिव्ह रूग्ण होम क्वारंटाइनमध्ये असताना शहरात फिरत असतील तर शेजाऱ्यांनी पालिकेला याची माहिती द्यावी. प्रत्येकाची लक्षणे वेगळी आहेत. आजार आवाक्‍याबाहेर जाण्यापूर्वीच नागरिकांनी काळजी घ्यावी. तपासणी करुन घेऊन पालिकेस सहकार्य करावे, असे दगडे-पाटील यांनी स्पष्ट केले. 

संपादन : वैभव गाढवे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid antigen testing of 20000 families in Barshi city