उजनी जलाशयामध्ये आढळले दुर्मिळ इंडियन स्टार जातीचे सोनेरी कासव ! 

Indian star Turtle
Indian star Turtle

केत्तूर (सोलापूर) : उजनीचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्‍याच्या सरहद्दीवरील कोंढार - चिंचोली व डिकसळ (ता. इंदापूर) येथील डिकसळ हद्दीतील उजनीच्या जलाशयात मच्छिमारी करताना पारधी समाजाच्या दाम्पत्यास एक दुर्मिळ समजले जाणारे कासव सापडले आहे. 

कासवांच्या जागतिक तस्करीत पहिला नंबर असलेल्या व जगभरातून दुर्मिळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इंदापूर (पुणे) तालुक्‍यात भिगवण जवळील डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे. सामान्य कासवांपेक्षा इंडियन स्टार कासव हे सुंदर, असामान्य व मनमोहक असून, त्याच्या बाह्य कवचावर तारांप्रमाणे दिसणारे मनमोहक सोनेरी रंगाचे सप्तर्षी आकाराचे ठिपके आहेत. 

कासवांच्या प्रजातीमध्ये इंडियन स्टार जातीच्या कासवाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटात तसेच पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका या देशांत ड्राय झोन भागात तर भारतात आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल येथे हे कासव आढळून आल्याच्या नोंदी आहेत. 

अंधश्रद्धा, घरात फेंगशुई, जादूटोणा, औषध निर्मिती आदी कारणांसाठी या कासवांची तस्करी जागतिक पातळीवर चालते. या जाती दुर्मिळ व नष्ट होऊ लागल्याने त्यांचे जतन करण्यासाठी इंडियन स्टार जातीचे कासव हे वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या तस्करीवर तसेच जवळ बाळगणे, पाळणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. 

सोनेरी पहाट पण... 
उजनीत मासेमारी करणारे पारधी समाजातील विनोद अभिलाल काळे व त्यांची पत्नी शिवानी हे दोघे नेहमीप्रमाणे उजनी पाणलोट क्षेत्रातील डिकसळ भागात पहाटे मासेमारीसाठी गेले होते. या वेळी उगवत्या सूर्य किरणांमध्ये त्यांना चमकणारी वस्तू दिसली. त्यामुळे मोठ्या कुतूहलाने जवळ जाताच त्यांना आतापर्यंत कधीच पाहण्यात नसलेले कासव दिसले. त्यांना हे कासव दुर्मिळ असल्याची जाणीव झाली. वास्तविक, तस्करीचा विचार मनात आला असता तर ही पहाट त्यांना सोनेरी ठरली असती; मात्र तसे न करता त्यांनी हे कासव वनविभागाच्या ताब्यात देण्याबाबत पत्रकार भरत मल्लाव यांच्याकडे प्रामाणिक विनंती केली. त्यानुसार हे कासव वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पाठीवर नक्षत्रांचा आलेख असलेले हे नजाकतदार कासव आशिया खंडातील भारतीय उपखंडातच आढळते. या कासवांचा वावर पाकिस्तानातील सिंध प्रांत, पश्‍चिमेकडील बंगाल प्रांतापर्यंत व दक्षिणेकडील श्रीलंकापर्यंत तुरळकपणे पाहायला मिळतो. दुर्मिळ प्रजातीचे हे कासव उजनीच्या पोटात आढळल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जैवविविधता अतुलनीय आहे, हे सिद्ध झाले. 
- प्रा. डॉ. अरविंद कुंभार, 
ज्येष्ठ पर्यावरण व पक्षी निरीक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com