राठोड गुरुजी करतात ऑनलाईन शिक्षणासाठी गुगल मिटचा अध्यापनात वापर 

संतोष सिरसट
Tuesday, 29 September 2020

गृहभेटींचा ठरलेला दिवस बुधवार 
आठवड्यातील प्रत्येक बुधवार हा गृहभेटीचा ठरलेला दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन, अध्यापनातील अडचणी, ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, अशासाठी स्वाध्यायसंच, गोष्टीची पुस्तके, लेखन साहित्य पुरवणे यासाठी हा दिवस राठोड गुरुजींनी राखीव ठेवला आहे. गावातील तरुण अभियंता दयानंद पाटील, उपसरपंच धनराज मनसावाले, किरण पाटील, संतोष डोंगरे, परमेश्वर डोंगरे, अनिल व्हनमाने, भीमा सीताफळे आदी पालक स्वतः मुलांकडे जातीने लक्ष देतात असेही राठोड यांनी सांगितले. 

सोलापूर ः कोरोनाच्या काळात "शाळा बंद पण शिक्षण चालू' हे ध्येय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत जिल्हा परिषद शाळा समशापूर (ता. उत्तर सोलापूर) येथील शिक्षक राहुल राठोड यांनी शाळास्तरावर विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी राठोड यांनी गुगल मीट ऍपचा पुरेपूर उपयोग करुन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले आहे. 
समशापूरच्या शाळेत पहिली ते पाचवी चे वर्ग आहेत. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी विविध उपक्रम राठोड गुरुजींनी राबविले आहेत. सुरवातीला त्यांनी पालकांचे व्हाट्‌सऍप ग्रुप तयार केले. त्या ग्रुपवर शैक्षणिक अभ्यासाचे वेळापत्रक तयार करुन पाठविले. सोमवार ते शनिवार या कालावधीत अध्यापनाचे विषय व घटक यांचे वेळापत्रक त्यांनी पालकांना दिले आहे. गुगल मीट या तंत्रज्ञानाचा वापर करून विषयाचे घटकनिहाय रोज एक तास ऑनलाईन अध्यापन करण्यास त्यांनी सुरवात केली ते अद्यापही सुरु आहे. प्रत्येक रविवारी मात्र आठवडाभरात झालेल्या घटकांचे ज्ञान विद्यार्थ्यांना कितपत अवगत झाले आहे, याचे मूल्यमापन गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून केले जाते. गुगल फॉर्म लिंकची रचना ही अशी केलेली आहे की पालकांना तत्काळ निकाल तिथेच पाहता येतो. जो विद्यार्थी अव्वल येतो, त्याला त्वरित ई मेलद्वारे प्रमाणपत्र देखील पालकांच्या मेलवर पोच होते. विद्यार्थी ज्या अध्ययन घटकात कमी आढळतो, त्याचा अधिकचा सराव यू ट्यूब व्हिडिओ लिंकचा वापर करून घेतला जातो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या प्रेरणेने उत्तर सोलापूर तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी बापू जमादार, विस्तारअधिकारी गोदावरी राठोड, केंद्रप्रमुख नबीलाल नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने शाळेत विविध तंत्रस्नेही उपक्रम राबविण्यावर भर असल्याचेही श्री. राठोड यांनी सांगितले. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rathod Guruji uses Google Meet for online learning