कावळ्याच्या तावडीतून अखेर त्याची सुटका कशी केली, ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

येथील ग्रामस्थ सुभाष व्हटकर यांनी जखमी अवस्थेतील करकोच्याचे प्राण वाचवून त्यास वन खात्याच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपुर्द केले. 

रोपळे बुद्रूक(सोलापूर)ः टॉवरवरून खाली पडलेल्या त्या पक्ष्याला दोन कावळ्यांनी गाठले. जखमी झालेल्या या पक्ष्याला कावळ्यांनी टोच्या मारून अधिक जखमी करायला सुरवात केली होती. अचानक हा प्रकार काही मुलांनी पाहिला. त्यांनी सुभाष व्हटकर यांना माहिती दिल्यानंतर अखेर त्या करकोचाचे प्राण वाचवणे शक्‍य झाले. हा पक्षी पांढऱ्या मानेचा करकोचा असल्याचे स्पष्ट झाले. 

हेही वाचाः लॉकडाउनच्या फावल्या वेळेत त्यांनी फुलवली सुंदर बाग 

येथील ग्रामस्थ सुभाष व्हटकर यांनी जखमी अवस्थेतील करकोच्याचे प्राण वाचवून त्यास वन खात्याच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपुर्द केले. 
येथील सुभाष व्हटकर यांना आज भल्या सकाळी गावठाणाच्या हद्दीत पांढऱ्या मानेचा करकोचा जखमी अवस्थेत आढळून आला. तेव्हा सुभाष व्हटकर यांनी कावळ्यांच्या तावडीतून या पक्षाची सुखरूप सुटका केली. यावेळी त्यांनी हा पक्षी सरपंच दिनकर कदम यांच्या ताब्यात दिला. यावेळी श्री. कदम यांनी विष्णु भगत यांच्या मदतीने पशुवैद्यकिय दवाखान्यात या पक्ष्यावर उपचारासाठी दाखल केले. उपचार करून या पक्ष्याला नंतर वन विभागाच्या ताब्यात दिले. पण त्यांनी दाखवलेल्या समय सुचकतेमुळे एका पक्ष्याचे प्राण वाचले. 

पांढऱ्या मानेचा करकोचा 
जखमी अवस्थेतील हा पक्षी पांढऱ्या मानेचा आहे. त्याचे इंग्रजी नाव Woolly-necked Stork असे आहे. त्याची लांबी साधारण 106 सेंमी असून तो आकाराने लांडोरी सारखा दिसत होता. एकंदरीत काळा व ठळक पांढरी मान. डोक्‍यावर काळी टोपी. बुड व शेपटी खालून पांढरा रंग दिसतो. त्याची चोच लालसर काळी असते. त्याच्या पायाचा रंग फिक्कट लाल असतो. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणारा हा पक्षी ओलिताखालील शेते, नद्या, पाणी साचलेली माळरानात आढळतो. मासे,बेडूक,सरपटणारे प्राणी , खेकडे, गोगलगायी व शिंपल्यातील मृृदुशरीरी प्राणी हा पक्षी खातो. 

कौतुकास्पद काम 
सुभाष व्हटकर यांच्या कार्यामुळे करकोचा पक्ष्याचे प्राण वाचले ही खरोखरच कौतुकाची बाब आहे 
- दिनकर कदम, सरपंच रोपळे बुद्रूक , ता . पंढरपूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read how he finally got rid of the crow's clutches