बंडखोरांचे "लाड' की नव्यांना संधी?, कोण असणार पुणे पदवीधरचा राष्ट्रवादीचा उमेदवार? 

logo
logo

सोलापूर : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला पश्‍चिम महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्‍न आता जवळपास मार्गी लागला आहे. पुणे पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र अद्यापही मिळत नसल्याने, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला सध्या अस्वस्थ आहे. "मला साहेबांनी शब्द दिलाय, तयारीला लाग म्हणून सांगितलयं' "असं म्हणत तीन ते चार जण सध्या "मीच उमेदवार' म्हणून पुणे पदवीधरचा मतदार संघ पिंजून काढत आहेत. सोलापूरचे उमेश पाटील अन श्रीमंत कोकाटे, सांगलीचे अरुण लाड आणि कोल्हापूरचे प्रताप माने या नावांभोवती उमेदवारीची चर्चा फिरु लागली आहे. 

या नावांमधील सांगलीच्या अरुण लाड यांनी पदवीधरची मागील निवडणूक राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी करुन लढविली होती. पाटील,कोकाटे आणि माने हे यंदाच्या निवडणुकीसाठी नवखे उमेदवार आहेत. बालेकिल्ल्यातील पदवीधरांचा आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असावा हे अनेक वर्षांचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले आहे. मागील निवडणुकीत सारंग पाटील यांच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण झाले असते. परंतु अरुण लाड यांच्या बंडखोरीमुळे हे स्वप्न धुळीस मिळाल्याची सल आजही सातारा परिसरात व अपरिहार्यपणे सारंग पाटलांच्या मनात आहे.त्यामुळे लाड यांना उमेदवारी मिळाल्यास साताऱ्यातील राष्ट्रवादी मनापासून काम करणार का? हा प्रश्‍नही आयत्यावेळी उपस्थित होऊ शकतो. यंदाच्या पदवीधर निवडणुकीतील उमेदवारीतून राष्ट्रवादीची व महाविकास आघाडीची भविष्यातील दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे यंदाची पदवीधरची उमेदवारी महत्वाची मानली जात आहे. 

या निवडणूकीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवारी कोणाला देतात? यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत. गेल्यावेळी बंडखोरी केलेले लाड यांना उमेदवारी मिळते की, पक्षाचे आक्रमक प्रवक्ते व पक्षविरोधी कृतीचा कसलाही डाग नसलेले उमेश पाटील यांना उमेदवारी मिळते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीमंत कोकाटे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नसले तरी, त्यांचा मराठा मतदारांवर प्रभाव असल्याने त्यांचाही विचार होऊ शकतो. मतदार नोंदणीत कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने प्रताप माने यांच्याकडेही लक्ष जाऊ शकते. पुणे पदवीधरची कुठल्याच पक्षाची उमेदवारी आजपर्यंत सोलापूर जिल्ह्याला मिळालेली नाही. यंदा उमेश पाटील किंवा श्रीमंत कोकाटे यांच्या माध्यमातून सोलापुरात जिल्ह्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा सोलापूर मधून व्यक्त होत आहे. 
उमेश पाटील हे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत. राज्यभर त्यांचा संपर्क आणि आक्रमक,अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.भाजप व राष्ट्रवादी मध्ये चर्चेत असलेल्या उमेदवारांमध्ये पाचही जिल्ह्यातील मतदारांना परिचित असलेले ते एकमेव सर्वात तरूण उमेदवार आहेत.पुणे जिल्ह्यातून राजकीय कारकीर्दीची सुरूवात व सोलापुरात जिल्ह्यातील जन्मभूमी असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील मतदारांना उमेश पाटील स्थानिक उमेदवार वाटू शकतात,शिवाय साता-याचे सारंग पाटील यांची आपसुक मिळणारी सहानुभूती तसेच बेरोजगारांसाठी केलेले काम, या उमेश पाटलांच्या जमेच्या बाजू आहेत. 

पुणे जिल्हा देणार आमदारकीचा कौल ....! 
पदवीधर मतदार नाव नोंदणीत अनुक्रमे सर्वाधिक मतदार पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत. मतदार नोंदणीचा निकष लावला तर, उमेश पाटलांच्या पारड्यात सोलापुर व पुण्यातील नोंदणी धरली जाईल. सांगली तिसऱ्या क्रमांकावर असल्याने या निकषात अरूण लाड मागे पडण्याची शक्‍यता आहे. श्रीमंत कोकाटे यांना जसा मानणारा वर्ग आहे तसाच त्यांना कडवा विरोध करणाराही वर्ग आहे. संभाजी ब्रिगेडचा शिक्का हा सर्वसमावेशक चेहरा होऊ शकत नसला तरी कट्टर मराठा तरूणांच्यात लोकप्रिय ठरू शकतो. पुणे शहरात वाढलेली मतदार नोंदणी राष्ट्रवादीसाठी चिंताजनक असली तरी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागावर अजित पवारांची पकड असल्याने, शहराची उणीव अजित पवार ग्रामीण भागात भरून काढू शकतील. उमेश पाटील यांची जन्मभूमी सोलापूर असली तरी कर्मभूमी पुणे असल्याने, त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना दुहेरी फायदा होऊ शकतो. 

अजित पवारांची भूमिका महत्वाची 
राष्ट्रवादीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांना पुणे जिल्ह्यातील मतदार स्वत:चा प्रभाव वापरून राष्ट्रवादीकडे वळवावा लागेल. मतदार नोंदणी मध्ये सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने अरूण लाड यांची बार्गेनींग पॉवर कमी झाली आहे व जयंत पाटलांनाही त्यांच्या जिल्ह्यातील उमेदवारीचा आग्रह धरण्याला मर्यादा आली आहे. पुणे जिल्हा मतदार नोंदणीत पहिल्या क्रमांकावर असल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उमेदवार निवडी संदर्भातील शब्दाला महत्व आले आहे. अरुण लाड यांना मतदार संघाची संपूर्ण माहिती आहे. मतदार संघातील दिग्गज नातेवाईक, मागच्या वेळचा निवडणुक लढवल्याचा अनुभव, प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील व सख्खे शेजारी असणे या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी वाढलेले वय ही त्यांची उणी बाजू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com