"टीम अंकोली निर्मित ऑनलाइन अभ्यासाचा नवा पॅटर्न'चा राज्यभरासह सिंगापुरातही डंका !

रमेश दास 
Monday, 10 August 2020

लॅपटॉप, मोबाईल यासह व्हॉट्‌सऍप, यू-ट्यूब, काईन मास्टर, फिल्ममेकर, पिक्‍सल लॅब, पिक्‍स आर्ट, इनशॉट आदी ऍपचा वापर करून ही मंडळी ऑनलाइन अभ्यास तयार करीत आहेत. 15 जूनपासून आजपर्यंत अविरत या टीमचे कार्य सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा केव्हा सुरू होतील याची अद्याप काहीच खात्री नसली, तरी या टीमच्या अभ्यासामुळे आमची मुले-मुली घरबसल्या शिकत आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली आहे. त्यामुळेच या अंकोली टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

वाळूज (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील अंकोली केंद्रातील चार शिक्षकांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला ऑनलाइन अभ्यास सातासमुद्रापार असलेल्या सिंगापूरसह राज्यात गाजत असून, सोलापूरसह इतर अनेक जिल्ह्यांतूनही यास मागणी आहे. त्यामुळे हा ऑनलाइन अभ्यास राज्यातील घराघरांत पोचत आहे. याची दखल घेत सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजयकुमार राठोड तसेच मोहोळ तालुक्‍याचे गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, माढा तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षण विस्ताराधिकारी विकास यादव यांनी या तंत्रस्नेही शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. 

हेही वाचा : प्रशासन सुधारेना, कोरोना आवरेना ! बाधितांमध्ये "ग्रामीण' गेले सोलापूर शहराच्या पुढे 

ज्यांच्या कल्पनेतून हा अभ्यास सुरू झाला, ते वरकुटे (ता. मोहोळ) येथील उपक्रमशील शिक्षक महेश गोडगे यांनी ऑनलाइन अभ्यासाविषयी सांगितले, की "सुरवातीला मी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास तयार करत होतो. मात्र चार वर्गांचा अभ्यास तयार करायला खूप वेळ लागायचा. याविषयी माझे मित्र दीपक पारडे, नेताजी रणदिवे व प्रदीप माळी यांच्याशी चर्चा केली. यावर ते तिघेही मदत करायला तयार झाले. प्रदीप माळी यांनी इयत्ता पहिली, नेताजी रणदिवे यांनी दुसरी, दीपक पारडे यांनी तिसरी तर मी इयत्ता चौथीच्या ऑनलाइन अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली आणि सुरू झाला "टीम अंकोली निर्मित ऑनलाइन अभ्यासाचा नवा पॅटर्न'. हा अभ्यास पीडीएफ स्वरूपात आहे. ठळक अक्षरात, आकर्षक रंगात, चित्रांसह हा अभ्यास आम्ही तयार करत आहोत. प्रत्येक इयत्तेची घटकनिहाय सोप्या शब्दांत मांडणी केलेल्या या अभ्यासामध्ये स्वतः निर्मित केलेले यू-ट्यूबवरील शैक्षणिक व्हिडीओ जोडले आहेत. त्यामुळे मुलांना अवघड घटक देखील चटकन समजतो. 

हेही वाचा : ब्रेकिंग! सोलापुरातील देगावच्या ओढ्यातील मगरींना पकडण्यासाठी ठरला "हा' प्लॅन 

शैक्षणिक अभ्यासासोबत कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, योगासने आदींचे व्हिडीओ देखील आम्ही स्वतः निर्मित करून या अभ्यासात जोडत आहोत. या अभ्यासात शेवटी आमचा मोबाईल क्रमांक देऊन अभ्यासाबद्दल प्रतिक्रिया मागवतो. त्यामुळे अनेक शिक्षकांचे, पालकांचे तसेच विद्यार्थ्यांचे जिल्ह्याबाहेरूनही फोन व मेसेजद्वारे चांगला प्रतिसाद येत आहे. व्हॉट्‌सऍपच्या ग्रुपवर तसेच ब्रॉडकास्टद्वारे रोज सकाळी आम्ही चौघेजण हा अभ्यास पाठवतो. शिक्षक मंडळी हा अभ्यास त्यांच्या शाळेच्या पालकांच्या ग्रुपवर पाठवितात. काही पालक इतर ग्रुपवर पाठवितात, असा या ऑनलाइन अभ्यासाचा प्रवास सुरू आहे. संपूर्ण राज्यभर हा अभ्यास पोचत आहेच, शिवाय या अभ्यासाचे पीडीएफ सातासमुद्रापार सिंगापूर येथे पोचले आहेत. तेथून देखील अभ्यासाबद्दलची प्रतिक्रिया महेश गोडगे यांना आली होती. मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर, जालना, बीड, लातूर, परभणी, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतील शिक्षकांच्या व पालकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. 

लॅपटॉप, मोबाईल यासह व्हॉट्‌सऍप, यू-ट्यूब, काईन मास्टर, फिल्ममेकर, पिक्‍सल लॅब, पिक्‍स आर्ट, इनशॉट आदी ऍपचा वापर करून ही मंडळी ऑनलाइन अभ्यास तयार करीत आहेत. 15 जूनपासून आजपर्यंत अविरत या टीमचे कार्य सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा केव्हा सुरू होतील याची अद्याप काहीच खात्री नसली, तरी या टीमच्या अभ्यासामुळे आमची मुले-मुली घरबसल्या शिकत आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली आहे. त्यामुळेच या अंकोली टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

अंकोलीचे तंत्रस्नेही शिक्षक महेश गोडगे म्हणाले, कोरोनाच्या महाभयंकर प्रलयामुळे शाळा बंद असल्या तरी खेडोपाडी, वाडीवस्तीवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी दररोज सलग पाच ते सहा तास लॅपटॉपवर काम करून अभ्यास तयार करत आहोत. यास शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to Ankoli's online study from the state as well as Singapore