धक्कादायक ! सेवानिवृत्त महिला पोलिस निरीक्षकाने घेतला महिला पोलिस उपनिरीक्षकाचा चावा; केले महिला वाहतूक पोलिसाला जखमी

अभय जोशी 
Saturday, 24 October 2020

गाडी अडवल्याने चिडून सेवानिवृत्त महिला पोलिस इन्स्पेक्‍टरने वाहतूक नियमनाचे काम करणाऱ्या एका महिला पोलिसाला जखमी केले आणि दुसऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट तोडून दाताने चावा घेतला. ही घटना येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाजवळ घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस इन्स्पेक्‍टरसह गाडी चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : गाडी अडवल्याने चिडून सेवानिवृत्त महिला पोलिस इन्स्पेक्‍टरने वाहतूक नियमनाचे काम करणाऱ्या एका महिला पोलिसाला जखमी केले आणि दुसऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट तोडून दाताने चावा घेतला. ही घटना येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाजवळ घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस इन्स्पेक्‍टरसह गाडी चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला पोलिस सोनाली इंगोले या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया समोरील रस्त्यावर वाहतूक नियमन करत होत्या. त्या वेळी कोर्टी रस्त्याच्या बाजूने एमएच 13 डीई 6944 ही कार आली. रेल्वे पुलाच्या दिशेने ती जात असताना फिर्यादी महिला कर्मचारी सोनाली इंगोले यांनी "रस्त्याचे काम सुरू असल्याने तुम्हाला तेथून जाता येणार नाही' असे समजावून सांगितले. 

परंतु तरीही संशयित आरोपी सेवानिवृत्त महिला पोलिस इन्स्पेक्‍टर वंदना उत्तम शिरगिरे (रा. इसबावी) आणि कारमधील चालक यांनी सोनाली इंगोले यांच्याशी हुज्जत घातली. रस्त्यावर कार आडवी लावून वाहतूक कोंडी केली. समजावून सांगूनही त्यांनी आरडाओरड करून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले. तेव्हा फिर्यादी सोनाली इंगोले यांनी त्यास मज्जाव केला आणि दोन्ही संशयित आरोपींना पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आणले. साक्षीदार महिला पोलिस उपनिरीक्षक महाडिक यांच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट तोडून त्यांच्या बोटाचा चावा घेतला आणि फिर्यादी सोनाली इंगोले यांना नखाने ओरखडले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सोनाली इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. गाडेकर पुढील तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired female police inspector injured female traffic police