बार्शी तालुक्‍यात सेवानिवृत्त शिक्षकाचा भरदिवसा खून 

प्रशांत काळे 
Thursday, 22 October 2020

सेवानिवृत्त शिक्षकाला मारहाण करताना नागरिकांनी दोघांनी पाहिले. नागरिक सोडवण्यास गेले असता तुमचीही विकेट उडवू, अशी धमकी देत ते लोकांवर दगडफेक करत होते, असे नातेवाईकांनी सांगितले. 

बार्शी (सोलापूर) : कळंबवाडी (आ) (ता. बार्शी) येथील सेवानिवृत्त शिक्षकांचा उंबरगे ते आगळगाव रस्त्यावर हायस्कूलसमोर बुलेटवरुन जात असताना भरदिवसा दोघांनी अडवून खून केला. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. त्रिंबक उमाप (वय 62) असे खून झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. 
याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिभीषण विश्वनाथ उमाप, विश्वनाथ बापू उमाप (दोघे रा. कळंबवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्रिंबक उमाप यांचा मुलगा गणेश उमाप यांनी फिर्याद दाखल केली. चार वर्षापूर्वी उमाप हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. बार्शी येथील मार्केट यार्ड येथून उडिदाची पट्टी घेऊन येतो, असे कुटुंबाला सांगून वडील त्रिंबक उमाप बुलेटवरुन दीड वाजता उंबरगे येथून गेले होते. दुपारी दोनच्या दरम्यान चुलत भाऊ सुमंत उमाप याने येथे तुझ्या वडिलांचे भांडण सुरु आहे लवकर ये, असे सांगितले. घटनास्थळी त्वरीत गेलो असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तेथे जमलेल्या नागरिकांनी त्यांना दोघांनी मारहाण केल्याचे पाहिले. सोडवण्यास गेले असता तुमचीही विकेट उडवू, अशी धमकी त्यांनी दिली व त्यांच्यावर दगडफेक करीत होते, असे नातेवाईक, नागरिकांनी सांगितले. अज्ञात कारणावरुन डोक्‍याचे पाठीमागे दगडाने मारुन जखमी केले. तसेच तोंडावर, डोळ्यावर बुक्‍क्‍यांनी मारल्याने मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर गावातील वाहनाने त्रिंबक उमाप यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired teacher murdered in Barshi taluka