सोलापूर महापालिकेत भ्रष्टाचार! कोरोनासाठी एकच वस्तू तीन वेगवेगळ्या दराने खरेदी; बिलेही दिली 

SMC
SMC

सोलापूर : कोरोनाचे सोलापुरात 12 एप्रिलाला आगमन झाले. तत्पूर्वी, शहरात कम्युनिटी क्‍लिनिकसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने सहा लाख 59 हजारांचा खर्च केला. त्यानंतर पाच हजार रुपयाला एक या दराने महापालिकेने 50 थर्मामीटर खरेदी केले. त्यानंतर तब्बल 200 थर्मामीटर अवघ्या दोन लाखांत खरेदी केले. दुसरीकडे पाच हजार लिटर सोडिअम हायपोक्‍लोराईड सोल्यूशनसाठी सुरवातीला दोन लाख रुपये मोजले. त्यानंतर मात्र, तेवढ्याच सोल्यूशनसाठी कधी पाच लाख 90 हजार रुपये तर कधी एक लाख 16 हजार रुपये दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या खर्चातील तफावतीमुळे काही बिले त्रुटी काढून परत पाठविण्यात आली आहेत. 

शहरातील कोरोना वाढू नये, नागरिकांमध्ये जागृती व्हावी म्हणून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी फलक, होर्डिंग्ज लावण्यासाठी पावणेसहा लाखांचा खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या आरोग्य आणि नगर अभियंता विभागाने कोरोना काळात विविध साहित्याची खरेदी केली आहे. त्यामध्ये थर्मामीटर, पल्स ऑक्‍सिमीटर, सिंगल यूज पीपीई किट, पीपीई किट, सोडियम हायपोक्‍लोराईड सोल्यूशन, ऍन्टिजेन टेस्टच्या किट, बीपाप मशिन, औषध-गोळ्या, वैद्यकीय उपकरणांची खरेदी केली आहे. त्यामध्ये मल्टिप्रा मॉनिटरसाठी 24 लाख 40 हजार रुपये तर दवाखान्यातील लॅपटॉपसाठी 99 लाख 71 हजार रुपये मोजले आहेत. मास्कची खरेदीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बाजारात मिळणारा सहा-सात रुपयांचा मास्क 11 ते 18 रुपयाला खरेदी केला आहे. दुसरीकडे थर्मामीटर आणि पल्स ऑक्‍सिमीटरलाही ज्यादा पैसे मोजले आहेत. औषध-गोळ्या आणि उपकरणांसाठी तब्बल सोडतीन कोटींचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या संपूर्ण खर्चाचा सविस्तर हिशेब न देता ठोक हिशेब महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. त्यावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेत, त्याची सविस्तर माहिती मागविली. त्यामध्ये ही तफावतसमोर आली आहे. 

कोरोनाच्या नावाखाली केलेला तातडीचा खर्च 

  • जनजागृती : 5,70,180 
  • सोडियम हायपोक्‍लोराईड सोल्यूशन : 17,45,122 
  • पीपीई किट : 23,85,000 
  • थर्मामीटर, ऑक्‍सिमीटर, ग्लोव्ह्‌ज : 35,65,850 
  • औषध-गोळ्या खरेदी : 42,97,649 
  • वैद्यकीय साधनसामग्री : 2,46,75,078 
  • ऍन्टिजेन टेस्ट किट : 1.80 कोटी 

महापालिकेचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे म्हणाले, आरोग्य विभाग आणि नगर अभियंता विभागाने कोव्हिड-19 च्या काळात अत्यावश्‍यक बाबींसाठी सुमारे पाच कोटींचा खर्च केला आहे. सभागृहात झालेल्या निर्णयानुसार या विभागांकडून खर्चाची सविस्तर माहिती घेतली जात आहे. माहिती उपलब्ध झाल्यानंतर पुढील सभेत मांडली जाईल. 

माजी सभागृहनेता सुरेश पाटील म्हणाले, बाजारात आठ ते नऊ रुपयास मिळणारा मास्क 12 आणि 18 रुपयास खरेदी केला आहे. सोडियम हायपोक्‍लोराईड सोल्यूशनसह औषध-गोळ्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या किमती दाखविण्यात आल्या असून ठराविक मक्‍तेदारांकडूनच त्या वस्तू खरेदी केल्या आहेत. याची सखोल चौकशी करून संबंधित मक्‍तेदारांनी बाजाराच्या तुलनेत अधिक दर घेतलेल्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात बिले दिली असतील, तर ती त्यांच्याकडून रक्‍कम वसूल करावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com