महापालिका कुणाचा बळी जाण्याची वाट पाहतेय का? दोन महिन्यांपासून खोदलेले रस्ते "जैसे थे'! 

श्‍याम जोशी 
Tuesday, 27 October 2020

सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यांची ड्रेनेज लाइनच्या कामासाठी सुमारे दोन महिन्यांपासून केलेली खोदाई अद्यापही "जैसे थे'च असल्याने कोणाचा तरी बळी जाण्याची वाट महापालिका पाहतेय का, असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. खोदकाम केल्याने शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. 

सोलापूर : सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यांची ड्रेनेज लाइनच्या कामासाठी सुमारे दोन महिन्यांपासून केलेली खोदाई अद्यापही "जैसे थे'च असल्याने कोणाचा तरी बळी जाण्याची वाट महापालिका पाहतेय का, असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. खोदकाम केल्याने शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. 

शहरातील बहुतांश प्रमुख रस्ते व गल्लीबोळातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. कुंभार वेस, कोंतम चौक, रविवार पेठ, जोडभावी पेठ, साखर पेठ, बाराइमाम चौक, समाचार चौक, माणिक चौक, मेन रोड, जुनी फौजदार चावडी, गवई गल्ली, जुने विठ्ठल मंदिर, दक्षिण कसबा, उत्तर कसबा, टिळक चौक, बाळीवेस, बुधवार पेठ, दत्त चौक, चौपाड, राजवाडे चौक, मुरारजी पेठ, जुना एम्प्लॉयमेंट चौक, व्हीआयपी रोड यासह अनेक भागातील रस्ते जेसीबीच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा फूट खोलपर्यंत करण्यात आलेल्या खोदाईमुळे दयनीय झाले आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप रस्त्याची दुरुस्ती मात्र झालेली नाही. त्यामुळे पादचारी, वाहनधारकांसह नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. 

महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष आहे की नाही, याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे सपाटीकरण केलेले नाही. त्यामुळे खड्डेच खड्डे असलेल्या रस्त्यातून पायी चालणेही मुश्‍किलीचे झाले आहे. अनेकजण या खड्ड्यांतून वाट काढताना पडलेही आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात तर या खोदाईमुळे गल्लोगल्ली चिखल होऊन राडा झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांतून पाण्याचे डोह तयार झाले आहेत. ड्रेनेजलाइनचे काम करतानाच पिण्याच्या पाण्याचे व्हॉल्व्ह उघडे पडले आहेत. त्यामुळे पावसात ड्रेनेजलाइन तुंबून त्यातील मैलायुक्त पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपमध्ये मिसळले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकणी नळाला मैलामिश्रित पाणी येत असल्याची तक्रार आहे. 

या कामांबाबत कोणतीच तक्रार महापालिका प्रशासनाकडून ऐकून घेतली जात नाही; कारण हे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यांनीच त्याचे निवारण करणे अपेक्षित असल्याचे अधिकारी सांगत आहेत. परंतु ठेकेदाराकडून काम रेटण्याचा उद्योग अन्‌ महापालिकेकडून ठेकेदाराच्या आडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवापूर्वीपासून काम सुरू आहे. आता दसरा गेला दिवाळीपूर्वी तरी रस्ते होण्याची अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहेत. बहुदा आता महापालिका कोणाचा तरी बळी जाण्याचीच वाट पाहतेय की काय, अशी शंका नागरिकांतून उपस्थित होत आहे. 

याबाबत योगेश जोशी म्हणाले, जुने विठ्ठल मंदिरापासून ते थेट एसटी स्टॅंडपर्यंतच्या रस्त्याच्या खोदाईमुळे दोन महिन्यांपासून या परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. जुनी ड्रेनेजलाइन काढून नवीन टाकणेचे कामही झाले, मात्र रस्ता झाला नाही. पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाच्या पाण्याने ड्रेनेजलाइन तुंबून ते घाण पाणी अनेकांच्या घरात जात असल्याने रोगराईची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळीच काम पूर्ण व्हावे. 

दीपाली आराध्ये म्हणाल्या, गेल्या दोन महिन्यांपासून रस्ते खोदल्याने घराच्या बाहेर पडणेही मुश्‍किलीचे झाले आहे. शहराचा विकास करताना ज्यांच्यासाठी हा विकास करतोय त्या नागरिकांचा विचार होणे गरजेचे आहे. एकाच वेळी सगळे रस्ते खोदून ठेवल्याने गावठाण परिसरातील नागरिकांची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे. चालताही येईना अन्‌ वाहनही चालवता येईना झाल्याने काम कधी पूर्ण होतेय याची वाट पाहावी लागत आहे. 

कर सल्लागार ऍड. गणेश वास्ते म्हणाले, ड्रेनेज व पाण्याच्या पाइपलाइनचे काम एकाच वेळी होणे अपेक्षित आहे. मात्र नियोजन नसल्याने या दोन्ही कामांसाठी रस्त्यांची खोदाई पुन्हा पुन्हा होत आहे. याशिवाय ठेकेदाराकडून खोदाई केलेल्या रस्त्याचे त्याचवेळी सपाटीकरण होत नसल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. गेल्या 50 वर्षांपासूनचे काम होत असल्याने विकास होईल यात शंका नाही परंतू त्यासाठी नियोजनाची गरज आहे. ते असते तर नागरिकांना त्रास झाला नसता. 

प्रशांत गंभीरे म्हणाले, दक्षिण कसबा परिसरात एकाचवेळी रस्त्याची खोदाई करून ठेवल्याने घराच्या बाहेर पडणेही कठीण झाले आहे. विकास करण्याला विरोध नाही मात्र रोगापेक्षा इलाज भारी, अशी अवस्था झाली आहे. खोदाईचे काम टप्प्याने करणे आवश्‍यक होते. या परिसरात बाजारपेठेसह वैद्यकीय सेवेसाठी परगावाहून येणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मोठी रेलचेल असताना या खड्ड्यांमुळे व्यापारी, ग्राहक व रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची गरज आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads being dug in Solapur city for the last two months are causing trouble to the citizens