चर्चा सुलतानपूर ग्रामपंचायतीची ! रोहनराज धुमाळ बनला एकविसाव्या वर्षी सरपंच

किरण चव्हाण 
Tuesday, 23 February 2021

माढा तालुक्‍यातील सुलतानपूरच्या सरपंचपदी एकविसाव्या वर्षीच रोहनराज हनुमंत धुमाळ यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. एकविसाव्या वर्षीच सरपंचपद मिळाल्याने रोहनराजची सर्व स्तरांतून चर्चा सुरू आहे. 

माढा (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील सुलतानपूरच्या सरपंचपदी एकविसाव्या वर्षीच रोहनराज हनुमंत धुमाळ यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. एकविसाव्या वर्षीच सरपंचपद मिळाल्याने रोहनराजची सर्व स्तरांतून चर्चा सुरू आहे. 

आपण कमी वयातच लोक नगराध्यक्ष, खासदार, आमदारच काय पण मंत्री झालेले पाहिले. परंतु आता ही कमी वयातच राजकारणात एंट्री करण्याची क्रेझ ग्रामीण भागातही सुरू झाली आहे. सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अवघ्या एकविसाव्या वर्षी रोहनराज धुमाळ यांची निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाईचा राजकारणाकडे असलेला कल यानिमित्त लोकांसमोर आला आहे 

26/11 च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात सुलतानपूरचे शहीद जवान राहुल शिंदे यांनी हौतात्म्य पत्करल्याने सुलतानपूर गावाला विशेष महत्त्व आहे. याच गावचा रोहनाराज धुमाळ हा माढा महाविद्यालयात शिक्षण घेत शेती करतोय आणि आता तो एकविसाव्या वर्षीच सरपंच झाला आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात रोहनराजच्या कमी वयातील सरपंचपदाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, रोहनराजचे आजोबा भारत धुमाळ पंचवीस वर्षांपूर्वी या गावचे सरपंच होते. 

गावचा विकास करण्याचे आहे प्रमुख ध्येय 
अनेक वर्षांपासून गावाचे शहीद जवान राहुल शिंदे यांचे नाव सुलतानपूरला देऊन राहुलनगर असे नामांतर करण्याचा विषय प्रशासकीय पातळीवर अडकून पडला असून, तो प्रश्न मार्गी लावणार आहे. शिक्षण, शेती आणि गावचा कारभार अशा तिहेरी जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणार असून, युवकांनी समाजकारण, राजकारणामध्ये देखील येऊन सकारात्मक कामे करावीत अशी अपेक्षा असून, हे करण्यासाठीच आपण राजकारणात उतरल्याचे रोहनराज धुमाळ यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून रोहनराज 96 मतांनी विजय झाले आहेत. 

महाविकास आघाडीने सर्व सात जागा जिंकत येथे एकहाती सत्ता मिळवली आहे. याच गावच्या उपसरपंचपदी कल्पना शिंदे या महिलेला संधी मिळाली आहे. निवडीवेळी सरपंचपदासाठी रोहन धुमाळ यांचाच एकमेव अर्ज आल्याने एस. जे. पोळके, वाय. वाय. तळेकर यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohanraj Dhumal of Sultanpur became Sarpanch in the twenty first year