मास्टर ब्लास्टर आणि बिग-बीसह दिग्गजांकडून "ग्लोबल टीचर' डिसले गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव ! 

सूर्यकांत बनकर 
Tuesday, 8 December 2020

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी डिसले गुरुजींनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले असून, शिक्षण ही व्यक्तीच्या जीवनातील अतिशय मौल्यवान भेट असल्याचे ट्‌वीट केले आहे. सोबत त्यांनी पुरस्काराची घोषणा झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

करकंब (सोलापूर) : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, मागील तीन दिवसांपासून सोशल मीडियामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, क्रिकेटचा देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनयातील बादशहा बिगबी अमिताभ बच्चन, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह कला, क्रीडा, शिक्षण, राजकारण आदी नानाविध क्षेत्रातील दिग्गजांनी डिसले गुरुजींचे अभिनंदन करणारे ट्‌वीट ट्विटरवर पोस्ट केले आहेत. 

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी डिसले गुरुजींनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले असून, शिक्षण ही व्यक्तीच्या जीवनातील अतिशय मौल्यवान भेट असल्याचे ट्‌वीट केले आहे. सोबत त्यांनी पुरस्काराची घोषणा झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

बिगबी अमिताभ बच्चन यांनी डिसले गुरुजींना ट्‌वीटद्वारे "आपण ग्लोबल टीचर पुरस्काराचे खरेखुरे मानकरी असल्याचे म्हटले असून, त्यांना "केबीसी कर्मवीर' ही उपाधी दिली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक असूनसुद्धा आपण ग्लोबल टीचर ऍवॉर्ड जिंकला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल "डिसले गुरुजींच्या असमान्य बुद्धिमत्तेला मी सलाम करतो व त्यांनी निम्मी रक्कम सहकारी नऊ शिक्षकांना दिल्याबद्दल विशेष अभिनंदन करतो', असे ट्‌वीट केले आहे. 

याशिवाय खालील मान्यवरांनी ट्विटरद्वारे डिसले गुरुजींचे अभिनंदन केले आहे :

  • शत्रुघ्न सिन्हा : अतिशय ब्रिलियंट आणि प्रामाणिक अशा डिसले गुरुजींनी जगातील एक नंबरचे यश संपादन केल्याबद्दल अंतःकरणपूर्वक अभिनंदन ! 
  • अनुपम खेर : ही तर देशाभिमान वाढविणारी गोष्ट आहे. 2020 मधील ग्लोबल टीचर ऍवॉर्ड सोलापूरमधील शिक्षकाला मिळणे ही खूप कौतुकास्पद बाब आहे. जय हो! 
  • दिया मिर्झा : अविश्वसनीय यशाबद्दल खूप खूप अभिनंदन! 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar and Amitabh Bachchan congratulated global teacher Ranjit Singh Disley on Twitter