"सहकार शिरोमणी'च्या सभासदांचे पै न्‌ पै देण्यासाठी आपण बांधील : कल्याणराव काळे 

धीरज साळुंखे 
Friday, 30 October 2020

सभासदांनी गाळपास दिलेल्या उसाचे बिल अदा करणे ही माझी जबाबदारी असून, सभासदांचे पै न्‌ पै देण्यासाठी आपण बांधील आहोत. ही बांधिलकी कायम जपणार आहे, असे प्रतिपादन सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले. 

भाळवणी (सोलापूर) : सभासदांनी गाळपास दिलेल्या उसाचे बिल अदा करणे ही माझी जबाबदारी असून, सभासदांचे पै न्‌ पै देण्यासाठी आपण बांधील आहोत. ही बांधिलकी कायम जपणार आहे, असे प्रतिपादन सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले. 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2020-21 चा 21वा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन विष्णू पोरे, रघुनाथ झांबरे, दामोदर दुपडे, संभाजी नाईकनवरे यांच्या हस्ते तर गव्हाणीचे मोळी पूजन ज्येष्ठ सभासद भगवान बुरांडे, ज्ञानेश्वर शेंबडे, नवनाथ माने, नारायण गायकवाड, महादेव कानगुडे, संजय गाजरे व रमेश नागणे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 29) पार पडला. प्रारंभी शेती विभागाचे प्रकाश शिंगटे व त्यांच्या पत्नी नागरताई शिंगटे या उभयतांच्या हस्ते होमहवन करण्यात आला. ज्येष्ठ सभासद संजय गाजरे व त्यांच्या पत्नी नीलावती गाजरे उभयतांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार परमेश्वर लामकाने होते. 

श्री. काळे म्हणाले, कारखान्याच्या ऊस नोंदणीचा विचार करता, सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे तसेच 75 लाख लिटर डिस्टिलरी उत्पादन आणि 4 कोटी युनिट निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ट्रक, ट्रॅक्‍टर, बैलगाडी, डम्पिंग, हार्वेस्टर यांना ऊस तोडणी वाहतुकीचे करार करून ऍडव्हान्स वाटप केला आहे. कारखाना दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. दुष्काळामुळे 2019-20 चा हंगाम बंद ठेवण्यात आल्यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने बॅंकेकडून निधी उपलब्ध करण्यास अडचणी आल्या तसेच ऊस उत्पादकांना अडचणींना सामोरे जावे लागले. हे वर्ष कोरोना, दुष्काळ परिस्थिती, शिल्लक साखरसाठा त्यामुळे होणारा अधिक व्याजाचा भुर्दंड यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. 

खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच शासनाची हमी मिळून राज्य बॅंकेकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम चालू करता आला. कारखान्यास निधी उपलब्ध करण्यासाठी विलंब झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करण्यास विलंब झाला. यापुढे ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री. काळे यांनी दिली. 

या वेळी यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण मोरे, उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू यलमार, सहकार शिरोमणीचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, कार्यकारी संचालक सुनील महिंद, विठ्ठल कारखाना संचालक उत्तम नाईकनवरे, निशिगंध बॅंकेचे उपाध्यक्ष आर. बी.जाधव, बाळासाहेब काळे, कैलास शिर्के व सहकार शिरोमणीचे संचालक उपस्थित होते. 

दिवाळीसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप 
दिवाळीसाठी कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकरी यांना सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी 50 किलो साखर 2 नोव्हेंबरपासून पंढरपूर, कारखाना कार्यस्थळावर व भोसे पाटी या तीन ठिकाणी साखर विक्री केंद्रातून करण्यात येणार आहे. संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी स्वतःचा आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवून साखर घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahakar Shiromani Sugar Factory starts sugarcane crushing season