साकत ग्रामस्थांचा नीलकंठा नदीतून जीवघेणा प्रवास ! नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची होतेय मागणी 

शांतिलाल काशीद 
Thursday, 24 September 2020

साकत, ढाळे पिंपळगाव, तांदूळवाडी, पाथरी, ममदापूर, गोरमाळे, पिंपळवाडी परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे ढाळे पिंपळगाव धरण ओव्हरफ्लो झाले. धरणाचा सांडवा सुटल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढून नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रातील पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे साकत येथील नीलकंठा नदीवरील पुलाजवळचा 100 फूट रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. नदीचे पात्र मोठे व पूल अरुंद असल्याने साकत, पिंपरी ग्रामस्थांना दरवर्षी मोठा त्रास सहन करावा लागतो. 

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील साकत येथील नीलकंठा नदीला पूर आल्याने शेतकऱ्यांना, नागरिकांना व आबालवृद्धांना नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. 

साकत, ढाळे पिंपळगाव, तांदूळवाडी, पाथरी, ममदापूर, गोरमाळे, पिंपळवाडी परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे ढाळे पिंपळगाव धरण ओव्हरफ्लो झाले. धरणाचा सांडवा सुटल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढून नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रातील पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे साकत येथील नीलकंठा नदीवरील पुलाजवळचा 100 फूट रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. नदीचे पात्र मोठे व पूल अरुंद असल्याने साकत, पिंपरी ग्रामस्थांना दरवर्षी मोठा त्रास सहन करावा लागतो. 

नीलकंठा नदीवरील पुलामुळे साकत-पिंपरी रस्ता जोडला गेला आहे. तसेच साकत येथील अनेकांची शेती नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूला आहे. अतिवृष्टीमुळे पावसात भिजून उरलंसुरलं सोयाबिन, उडदाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना, आबालवृद्धांना नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच शेतीची अवजारे, जनावरे, मजूर, शेत मालवाहतूक करण्यासाठी नेहमीच मोठी कसरत करावी लागते. "सकाळ'ने दोन वेळा "साकत-पिंपरी पुलाची दुरवस्था; पुलाजवळ पडले भगदाड' हे वृत्त प्रसिद्ध करून शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या उद्विग्न भावना व प्रतिक्रिया प्रशासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. संबंधित विभागाच्या सततच्या दुर्लक्षामुळे व झालेल्या निकृष्ट कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

पिंपरी-साकत रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागते. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडींमुळे मोठा रस्ता आहे की पाणंद आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवून साकत-पिंपरी रस्ता दुरुस्तीची मागणी पुढे येत आहे. 

याबाबत साकत येथील शेतकरी उमेश वाघ म्हणाले, पुलाची उंची कमी व लांबी अरुंद असल्याने पावसाळ्यात दरवर्षी शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो. ढाळे पिंपळगाव तलवातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नीलकंठा नदीत दीड ते दोन महिने पाण्याचा प्रवाह सुरू असतो. अशा भीषण स्थितीत उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतीसाठी जीवघेणा प्रवास सुरू असतो. संबंधित विभागाने येणाऱ्या काळात नदीवर पुलाची उंची वाढवून शेतकऱ्यांचा, नागरिकांचा होणारा त्रास कमी करावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakat villagers life threatening journey through Nilkantha river