अखेर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान अवताडे मैदानात ! 

Avtade_BJP
Avtade_BJP

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने मंगळवेढा येथील उद्योगपती व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्ली येथे केंद्रीय भाजप समितीने श्री. अवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामुळे आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होणार आहे. 

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारचा (ता. 30) शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अजूनही उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे दिवगंत आमदार भारत भालके यांचे पुत्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. परंतु पक्षाने अद्याप उमेदवारीची घोषणा केली नाही. तरीही भालके यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असतानाच आज भाजपने समाधान अवताडे यांच्या नावावर उमेदवारीचा शिक्कामोर्तब केला आहे. भाजपकडून विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, समाधान अवताडे, नगराध्यक्षा सधाना भोसले आदी इच्छुक होते. परंतु आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर भाजपने परिचारकांच्या सहमतीनेच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आमदार परिचारकांची सर्व राजकीय ताकद अवताडे यांच्या मागे उभी राहणार, हे ही आता स्पष्ट झाले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. दीड वर्षानंतर प्रथमच पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीबद्दलचा जनतेचा कल समोर येणार आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपनेही व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीला तोडीस तोड उमेदवार म्हणून समाधान अवताडे यांना भाजपने निवडणूक मैदानात उतरवले आहे. 

याशिवाय महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील आणि शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. बिघाडीचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसणार, हे ही तितकेच स्पष्ट आहे. त्यामुळे दिवगंत आमदार भारत भालके यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारास किती सहानुभूती मिळते, यावरच भवितव्य अवलंबून राहणार आहे; अन्यथा राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपचे कमल फुलले तर आश्‍चर्य वाटायला नको, अशी येथील राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. 

परिचारकांचा पाठिंबा महत्त्वाचा 
मागील दोन निवडणुकांमध्ये परिचारकांचा काही हजार मतांनी पराभव झाला आहे. परिचारकांना मिळालेली मते विचारात घेता, आजही पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यात परिचारकांची राजकीय शक्ती मोठी आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, दूध संस्था, साखर कारखाने, बॅंका, पंतसंस्थांसह अनेक शैक्षणिक संस्थांवर परिचारकांचे आजही एकहाती वर्चस्व आहे. आजपर्यंत परिचारकांना केवळ जातीचा फटका बसला आहे. आजही त्यांच्या मागे असलेली मोठी शक्ती त्यांनी भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्यामागे भक्कमपणे उभी केल्यास अवताडे यांच्यासाठी ही जमेची बाजू असेल, अशी नोंद येथील राजकीय विश्‍लेषकांनी केली आहे. त्यामुळे परिचारकांचा पाठिंबा हा पोटनिवडणुकीतील उमेदवाराला विजयापर्यंत पोचवण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com