संगे भावांचा मेळा... ती जपतेय स्वावलंबनाचा बाणा 

renuka kattimani.jpg
renuka kattimani.jpg

सोलापूरः आता मला वाटतंय की मी माझ्या भावाप्रमाणे स्वत: च्या बळावर माझे जीवन जगू शकते. दररोज माझे काम करून चार पैसे मिळवत असताना मला माझे शिक्षणदेखील पूर्ण करता येणार आहे. कारण संगे भावांचा मेळा आहे. यामुळे मी स्वावलंबनाचा बाणा जपतेय, असे माळकवठे येथील रेणुका कट्टीमनी या सांगत होत्या. 

माळकवठे (ता. उत्तर सोलापूर) येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी रेणुका कट्टीमनी बोलत होत्या. 

माझ्या घरात वडिलांचा स्वतःचा भेळपुरीचा गाडा आधीपासून होता. दोन्ही भाऊ पुण्यात कामासाठी जातात. कधी कामे मिळायची, तर कधी मिळत नव्हती. त्यात लॉकडाउन सुरू झाले. दोन्ही भाऊ घरी परत आले. त्यावेळी माझ्याकडे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्रदेखील नव्हते. पण कामाची निकड होती. काही ना काही तर करायचे होते. दोन्ही भावांनी माझे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मला सिव्हील हॉस्पिटलला नेले. तपासणीमध्ये प्रमाणपत्र देण्यासाठी बरीच धावपळ केली. तेव्हा शेवटी प्रमाणपत्र मिळाले. पण मदत कशी मिळते, याची माहिती मला नव्हती. तेव्हा भावांनी मला सगळीकडे फिरणे शक्‍य होणार नाही, म्हणून माझ्यासाठी समाजकल्याण विभाग व बॅंकेकडे मदत मागितली. 
समाजकल्याण खात्याने बीज भांडवल योजनेतून 75 हजार रुपयाचे कर्ज मंजूर केले. त्यातून भावांनी एक स्टॉलची खरेदी केली. वडिलांनी माझ्या दोन्ही भावांना घरापासून लांब अंतरावर असलेल्या भेळपुरीच्या गाडीवर काम करण्यास सांगितले. मी आई-बाबा जवळ राहून काम सुरू केले. घरासमोर स्टॉल लावल्यानंतर भेळ, पाणीपुरी, वडापाव तयार करण्यासाठी सर्व सामान खरेदी केले. पहिल्या दिवशीची कमाई चारशे रुपये झाली. त्यातून साहित्याचा खर्च वजा जाता शंभर रुपये उरले. पण स्वतःची कमाई सुरू झाली. नंतर कधी आठशे, तर कधी हजार रुपये येऊ लागले. आई व बाबांच्या मदतीने मी घरासमोर हा स्टॉल चालवू लागले. घरासमोर स्टॉल असल्याने मी कोरोनाचे नियम पाळून पार्सल देत होते. 
आता माझ्या शिक्षणाचा खर्च मला करता येणार आहे. बी. ए. ची पदवी मला पूर्ण करायची आहे. मला माझ्या परिस्थितीवर मात करून स्वतःच्या पायावर उभे होता आले, ही गोष्ट खूप मोठी झाली. माझे भाऊ ज्याप्रमाणे पैसे कमावतात, तशी मी देखील आता स्वतःच्या कमाई करू शकते. माझ्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची होती. पण तरीही शिक्षण सोडायचे नाही. 
पदवी पूर्ण करण्याचा बांधला चंग 
रोजचे काम करून मी अभ्यास करणार आहे. पदवी पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. कारण मी स्वावलंबी झाले, तर आता शिक्षणाची फी मला भरता येणार आहे. आता घरात आम्ही सर्वच भावंडे काम करत आहोत. मला काही साहित्य कमी पडले, तर भाऊ आणून देतात. घरासमोर स्टॉल लावून मला माझे काम करता येते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com