पुणे विभागात सांगोला तालुक्‍याची बाजी 

दत्तात्रय खंडागळे
रविवार, 3 मे 2020

उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न 
प्रिया सॉफ्ट क्‍लोजिंगमध्ये आम्ही गेले वर्षभर जिल्ह्यात आघाडीवर आहे. दर महिन्याला ग्रामपंचायतचे महिना अखेर पूर्ण (मंथ बुक क्‍लोजिंग) करण्याला आम्ही प्राधान्य देत आलो. याबाबत पंचायत समिती स्तरावरून सतत पाठपुरावा करण्यात आला. सर्व विस्तार अधिकारी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, केंद्र चालक यांच्या टीम वर्कमुळे प्रिया सॉफ्टमध्ये वर्ष अखेर क्‍लोज करण्यात यश मिळाले. यापुढेही सर्वांच्या समन्वयाने उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहे. 
- संतोष राऊत, गटविकास अधिकारी, सांगोला 

सांगोला (जि. सोलापूर) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व ग्रामपंचायतींना त्यांचे आर्थिक लेखे प्रिया सॉफ्ट (पंचायत राज इन्स्टिट्यूशन अकाऊंटिंग सॉफ्टवेअर) या आज्ञावलीमध्ये भरणे बंधनकारक आहे. 2019-20 हे आर्थिक वर्ष मार्च 2020 अखेर संपल्यानंतर या वर्षातील जमा खर्चाच्या नोंदी प्रिया सॉफ्टवेअरमध्ये भरून वर्ष अखेर पूर्ण करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतचे लेखे प्रिया सॉफ्टमध्ये भरून पूर्ण करणारा सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यातील तसेच पुणे विभागातील पहिला तालुका ठरला असल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी दिली. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंचल पाटील यांनी तसेच आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्‍यातील सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या जमा खर्चाचा ताळेबंद तयार केला. तसेच ग्रामपंचायतची खाती ज्या बॅंकेत आहेत, त्या बॅंकांना संपर्क करून आर्थिक बाबींचा ताळमेळ घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतच्या सर्व खात्यांचे जमा खर्चाचे आर्थिक लेखे अंतिम केले. त्यानंतर या सर्व नोंदी ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र चालक यांनी प्रिया सॉफ्ट या आज्ञावलीमध्ये ऑनलाईन पद्धतीने भरून आपल्या ग्रामपंचायतचे वर्ष अखेर पुर्ण (इयर बुक क्‍लोजिंग) करून घेतले. 
तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतचे लेखे प्रिया सॉफ्टमध्ये भरून पूर्ण करणारा सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यातील तसेच पुणे विभागातील पहिला तालुका ठरला आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी गट विकास अधिकारी संतोष राऊत, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी श्रावण घाडगे, नवीन काळे, योगेश गोटे, तालुका व्यवस्थापक संतोष अर्जुन तसेच तालुक्‍यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व केंद्रचालक यांचे अभिनंदन केले आहे. 
मागील अनेक दिवसांपासून गट विकास अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्‍यातील ग्रामपंचायती उत्कृष्ट काम करताना दिसत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी विभागाच्या योजना, चौदावा वित्त आयोग, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा अशा अनेक विभागाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सांगोला पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायती उत्कृष्ट काम करत आहेत. त्याबद्दल अनेक वेळा पंचायत समितीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या कामाबद्दल पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. 

 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangola taluka wins in Pune division