सात जणांचे जीव गेलेत, नुसते खड्डे काय बुजवता

संतोष कानगुडे
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

माळढोकमुळे उशीर 
बार्शी-सोलापूर रस्त्याच्या कामाला माळढोक पक्षी अभयारण्याशी संबंधित विभागाच्या परवानगीमुळे दिरंगाई होत आहे. यावर आपला विभाग जाणून बुजून कोणतेही दुर्लक्ष करत नाही. वरील अडथळा दूर झाल्यास लगेच रस्त्याच्या कामास गती मिळेल. 
- सौरभ होनमुटे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बार्शी 

पानगाव (जि. सोलापूर) : बार्शी-सोलापूर राज्यमार्गावरील राळेरास ते शेळगाव (आर) दरम्यान महाशिवरात्री (ता. 21) दिवशी बस व क्रूझर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वांच्याच टीकेचे लक्ष बनलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन दिवसांनंतर वैराग-पानगाव-बार्शी या रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे ठेकेदाराकडून बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या हे काम सुरू आहे. मात्र, नागरिक प्रशासनाच्या नुसतेच खड्डे बुजवण्यावरून संतप्त झाले असून सात जणांचा जीव गेला आहे, नुसते खड्डे काय बुजवता, संपूर्ण रस्त्याचे काम चांगले करा अशी तीव्र भावना भावना व्यक्त करत आहेत. 

हेही वाचा - तीन चाकी सरकारचा टेम्पो पलटी करणारच : निंबाळकर 

या खराब रस्त्यामुळे खड्डे चुकविताना केवळ लहानच नव्हे तर मोठी वाहनेदेखील अपघाताची शिकार होत असल्याचे गत एक महिन्यापासून दिसून येत आहे. अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातग्रस्त झाले असून यातील कोणी जीवाला मुकले आहे तर कोणी कायमचे दिव्यांग झाले आहे. शुक्रवारच्या (ता. 21) अपघातामुळे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून या अपघातातील मृत्यूची आता संख्या सातवर गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या चालू असलेल्या रस्त्याच्या डागडुजीवर नागरिक समाधानी नसून आता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम करावे अन्यथा ठिकठिकाणचे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

कामाबाबत ठोस कार्यवाहीच नाही 
बार्शी-सोलापूर रस्ता मोठा होणार असल्याचे ऐकून-ऐकून कंटाळा आला. कधी होणार याबाबत काही ठोस कार्यवाही दिसून येत नाही. पण खड्डे बुजवण्यापेक्षा लवकरात लवकर रस्ताच करण्यात यावा. 
- डॉ. शंकर भोसले, कळंबवाडी (पा), ता. बार्शी 

अनेक घरातील कर्ते पुरुष गेले 
बार्शी-सोलापूर मार्गावर खड्ड्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेकांना विशेषकरून घरातील कर्त्या युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांची मोठी कौटुंबिक हानी झालेली आहे. अशा बाबींचा विचार करून शासनाने त्वरित यावर कार्यवाही करून रस्त्याचे काम हाती घ्यावे. 
- अंकुश भिसे, सदस्य, ग्राम सुरक्षा समिती, पानगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven people died, Just what the pits do