"पंढरपूर-मंगळवेढा'ची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास स्वागत, मात्र निवडणूक लागल्यास मीही इच्छुक ! शैला गोडसेंचा दावा 

हुकूम मुलाणी 
Thursday, 24 December 2020

स्व. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे होणारी पोटनिवडणूक जर सर्वांच्या मते बिनविरोध होत असेल तर स्वागत आहे. परंतु, जर निवडणूक लागणार असेल तर या निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहोत, असा दावा शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी केला. 

मंगळवेढा (सोलापूर) : स्व. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे होणारी पोटनिवडणूक जर सर्वांच्या मते बिनविरोध होत असेल तर स्वागत आहे. परंतु, जर निवडणूक लागणार असेल तर या निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहोत, असा दावा शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी केला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांनी या तालुक्‍याच्या दक्षिण भागातील बहुतांश गावांचा दौरा करून, या भागातील जनतेचा कानोसा घेत असताना भाळवणी येथील भेटीत त्या बोलत होत्या. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शैला गोडसे या 2009 च्या फॉर्मुल्यानुसार शिवसेनेकडून इच्छुक होत्या. परंतु भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या युतीत ही जागा रयत क्रांती पक्षाला देण्यात आल्यामुळे त्यांना थांबावे लागले. असे असले तरी त्यांनी शिरनांदगी तलावात ऐन थंडीत केलेलं आंदोलन तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी नंदेश्वर येथे केलेले आंदोलन अधिक चर्चेत राहिले. म्हैसाळ योजनेत सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु, सलगर बु या गावांचा समावेश करण्यासाठी तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा या भागांमध्ये अधिक चर्चेत आला. याशिवाय इतर छोट्या - मोठ्या कार्यक्रमांत सहभाग घेऊन आपणही विधानसभेसाठी सक्षम असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांना थांबवून रयत क्रांतीमधून सुधाकरपंत परिचारक यांना संधी देण्यात आली होती. 

या भागातील लोकप्रतिनिधी नसताना शैला गोडसे यांनी 2019 पूर्वी घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधला. संधी दिल्यास लोकांच्या प्रश्नांसाठी पूर्णवेळ काम करण्याची भूमिका विशद केली होती. तर स्वतःला मताचा अधिकार नसताना कुरूल जिल्हा परिषद गटात आंबेचिंचोलीच्या महिला सरपंच म्हणून केलेल्या कामामुळे अनेक प्रश्न मार्गी लावले. स्वत:कडे सहकारी संस्था नसल्यामुळे या भागातील रखडलेल्या प्रश्नाला पूर्णवेळ वाचा फोडण्यासाठी वेळ देऊ शकत असल्याने या भागातील लोकप्रतिनिधी होण्यासाठी त्या इच्छुक आहेत. 

स्व. भारत भालके व स्व. सुधाकरपंत परिचारक हे या मतदारसंघातून यापूर्वी लढले असले तरी आज हे दोघेही हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्या वारसदारांना निवडणूक न लढता बिनविरोध केले जात असेल तर स्वागत आहे, पण जर निवडणूक लागणार असेल तर आपणही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत. 
- शैला गोडसे, 
शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shaila Godse is keen for Pandharpur Mangalwedha Assembly byelection