esakal | शरद पवारांनी जपले सोलापुरातील सच्चा कार्यकर्त्यासोबतचे नाते 
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad_Pawar

2009 ते 2014 या कालावधीत यूपीए सरकारमधील केंद्रीय गृहमंत्रिपद सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे होते, तर त्याच कालावधीत देशाचे कृषी मंत्रिपद माढ्याचे तत्कालीन खासदार शरद पवार यांच्याकडे होते. एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी राजकीय किमयाही राज्यात फक्त सोलापूर जिल्ह्यानेच सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निमित्ताने करून दाखविली आहे. त्याच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अनेक जिवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यातीलच एका कार्यकर्त्यासोबतची नाळ शरद पवारांनी आज पुन्हा एकदा घट्ट केली आहे. 

शरद पवारांनी जपले सोलापुरातील सच्चा कार्यकर्त्यासोबतचे नाते 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : राज्याच्या राजकारणात सोलापूरचे महत्त्व कायमच अबाधित राहिले आहे. 2009 ते 2014 या कालावधीत यूपीए सरकारमधील केंद्रीय गृहमंत्रिपद सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे होते, तर त्याच कालावधीत देशाचे कृषी मंत्रिपद माढ्याचे तत्कालीन खासदार शरद पवार यांच्याकडे होते. एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी राजकीय किमयाही राज्यात फक्त सोलापूर जिल्ह्यानेच सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निमित्ताने करून दाखविली आहे. त्याच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अनेक जिवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यातीलच एका कार्यकर्त्यासोबतची नाळ शरद पवारांनी आज पुन्हा एकदा घट्ट केली आहे. 

पवारांच्या आयुष्यातील पहिले मंत्रिपद सोलापूर जिल्ह्याचे असल्याने पवारांच्या आयुष्यात सोलापूर आणि सोलापूरच्या समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण यामध्ये पवार या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानले जातात. सोलापूर जिल्ह्यातील अनेक घराण्यांतील तिसऱ्या पिढीसोबत शरद पवारांनी नाळ कायम ठेवली हे विशेष. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली आणि सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांनी भोसे (ता. पंढरपूर) येथील यशवंतभाऊ पाटील यांच्यावर सोपविली. नंतरच्या काळात जिल्हा राष्ट्रवादीची धुरा अनेकांकडे गेली; परंतु पाटील आणि पवार परिवारातील ऋणानुबंध अद्यापपर्यंतही कायम राहिला. 

यशवंतभाऊ यांच्यानंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची धुरा यशवंतभाऊ यांचे चिरंजीव राजूबापू पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. राजूबापू पाटील यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का सर्वांनाच बसला. कोरोनाच्या संकटातही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसे (ता. पंढरपूर) येथे येऊन पाटील परिवाराचे सांत्वन केले. "आम्ही तुमच्यासोबत आहोत' असा विश्‍वास दिला. 

भोसे येथील पाटील परिवारातील तिसऱ्या पिढीतील सदस्य भोसे गावचे उपसरपंच ऍड. गणेश पाटील यांची आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश पाटील यांना आज मुंबईत नियुक्तिपत्र देण्यात आले. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष (कै.) राजूबापू पाटील यांचे गणेश पाटील हे चिरंजीव आहेत. त्यांच्या या निवडीतून राष्ट्रवादीने पवार व पाटील परिवाराच्या ऋणानुबंधाला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. "राष्ट्रवादी कॉंग्रेस सच्चा कार्यकर्त्यांसोबत नेहमी असते' असा मेसेजच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांनी या निवडीतून दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल